झारखंडमधील नक्षलग्रस्त भाग जमशेदपूर गावची रहिवासी असणाऱ्या 22 वर्षीय मुलीने संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने परी सिंहला नवी दिल्लीत एक दिवसासाठी ऑस्ट्रेलियाची राजदूत होण्याचा मान मिळाला. सुटाबुटात परी अत्यंत आत्मविश्वासात वावरताना दिसत होती. भारतातील ऑस्ट्रेलियाच्या राजदूत हरिंदर सिधू यांनी परीला उच्चायुक्त कार्यालयातील कामाची माहिती दिली.
परी ग्रामीण भागात महिला सशक्तीकरण तसंच बालविवाह रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करते. यामुळेच प्लॅन इंडियाकडून तिची निवड करण्यात आली. परीने मुलींच्या अधिकारासाठीही खूप काम केलं आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये प्लॅन इंडियाचे गुडविल अॅम्बेसिडर अनिल कपूर यांच्याकडून तिचा सन्मान कऱण्यात आला.
मुलींसाठी काम केल्याबद्दल परीला यूथ चॅम्पिअन पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तसंच मुलींच्या अधिकारांसाठी लढा दिल्याबद्दल यूथ चॅम्पिअन फॉर गर्ल्स राईट अवॉर्डही देण्यात आला.
परी नक्षलग्रस्त भागात राहते. तिथे सर्वच लोक नक्षलवाद्यांच्या भीतीच्या छायेत वावरत असतात. अशा ठिकाणी जर एखाद्याला नक्षलवाद्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर शिक्षण गरजेचं असल्याचं परी सांगते.
‘शिक्षण असेल तर व्यक्ती नक्षलवाद आणि त्यांच्या विचारधारेशी लढू शकते. आपण प्रत्येक मुलाला शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरुन काय योग्य आणि काय अयोग्य याची निवड त्यांना करता येईल. शिक्षणामुळे लोकांना त्यांचे हक्क कळतील’, असं परी सांगते.
ऑस्ट्रेलियाची राजदूत होण्याची संधी मिळाल्यासंबंधी विचारलं असता परी सांगते की, ‘मला प्रचंड आनंद झाला आहे. मी गावातील इतर मुलांनाही प्रेरणा दिली असेल अशी आशा आहे’. परी गावी परतल्यानंतर गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत करत तिचा सत्कार केला.