आपल्याला जंगल सफारीला जाण्याची किती भारी हौस ना! पण जंगलातल्या प्राण्यांचा काही नेम नसतो. ते कधी, कसे वागतील काही सांगता येत नाही. त्यांच्या मनात आलं तर आपल्यावर हल्ला करून जंगलातून आपल्याला पार पलिकडे हुसकावून लावायला देखील ते मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा जंगल सफारीला जाताना ही संकटं येणार हे गृहीत धरूनच चालावं लागेल. जिम कॉर्बेट अभयारण्यात पर्यटकांना याची चांगली प्रचिती आलेली. पर्यटनासाठी जंगलात गेलेल्या पर्यटकांना पाहून एक हत्तीने त्यांचा चांगलाचा पिच्छा पुरवला. इतका की पर्यटकांना पळता भुई थोडी झाली होती. सुदैवाने हे सारे पर्यटक जिप्सीमध्ये असल्याने गजराजांच्या क्रोधापासून ते वाचले.
काही अंतर दूरपर्यंत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी हत्ती त्यांच्या मागे धावला पण सुदैवाने चालकाने गाडीचा वेग वाढवून पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी आणले. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या गीर अभयारण्यात देखील असाच प्रकार घडला होता. इथे छोट्या गाडीने पर्यटक सफारीला निघाले होते. अन् जंगलाच्या राजांनी त्यांना मध्येच गाठलं होतं. चार पाच सिंहांने गाडीवर हल्ला करून काचा फोडण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने सिंहाच्या हल्ल्यातून पर्यटक अगदी थोडक्यात बचावले नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.