आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमतून लोक आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती संपूर्ण जगाला देऊ शकतात. वाढदिवसाचे सेलिब्रेशन असो की लग्न किंवा नव्याने मिळालेली नोकरी यासारख्या अनेक गोष्टींची माहिती लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. तर काही लोक हीच माहिती अनोख्या अंदाजात देण्याचा प्रयत्न करतात. याबाबतचे असे अनेक फोटो व्हिडीओ असतात जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीने नोकरी लागल्याची माहिती अनोख्या अंदाजात दिली आहे.
अनोख्या पद्धतीने केली घोषणा –
प्रतिक्षित पांडे नावाच्या व्यक्तीला कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या कम्युनिकेशन विभागात नोकरी मिळाली आहे. येथे ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. पांडे यांनी ही माहिती अनोख्या पद्धतीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेत्याप्रमाणे लावले पोस्टर –
पांडेने आपल्या नवीन नोकरीची माहिती एखादा नेता निवडणूक जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे पोस्टर लावतो अशा पद्धतीने दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या गळ्यात अनेक फुलांच्या माळा दिसत आहेत. तसेच हात उंच करत विजयाचे चिन्ह दाखवण्यासाठी दोन बोटे दाखवताना दिसत आहेत. या पोस्टरमध्ये त्यांचे अभिनंदनाचे संदेश लिहिल्याचंही पाहायला मिळत आहेत. शिवाय या विद्यापीठातील इतर प्राध्यापकांच्या फोटोंचाही समावेश असून त्यांच्या फोटोसमोर शुभेच्छुक असं लिहिलं आहे. पोस्टरमध्ये पांडे जानेवारी २०२४ पासून विद्यापीठात रुजू होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
नोकरीचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी त्यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलं, “जर मी पुढे अभ्यास सुरू ठेवला आणि मला नोकरी मिळाली अशाच पद्धतीने पोस्टर तयार करेन.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नोकरी लागल्यानंतर अशी घोषणा केल्याचं कधीच पाहिलेलं नाही.”