डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत जॉर्डन एअर लाईन्सने एक जाहिरात केली होती. ज्या जाहिरातीची जगभरात चर्चा होती. ‘जोपर्यंत तो विजेता होत नाही आणि तुम्हाला तिथे जाण्याची परवानगी नाकारली जात नाही तोपर्यंत अमेरिकेचा प्रवास सुरू ठेवा’ अशा प्रकारची उपहासात्मक जाहिरात जॉर्डन एअर लाईन्सने केली होती. विशेष म्हणजे जॉर्डन एअर लाईन्स ही सरकारी कंपनी आहे, त्यामुळे या जाहिरातीकडे अनेकांचे लक्ष खेचले गेले. डोनाल्ड यांनी अनेकदा मुस्लिम समाजाविरोधात नारे दिले होते. अमेरिकेतून मुस्लिम समाजाला हाकलले पाहिजे अशी टोकाची भूमिका त्यांनी मांडली होती. म्हणून जॉर्डन एअर लाईन्सने ट्रम्प यांच्या वक्तव्याचे विडंबन करत जाहिरात केली होती. जॉर्डनमध्ये ९७ टक्के नागरिक हे मुस्लिम आहेत. या एअरलाईन्सने केलेल्या जाहिरातीनुसार जॉर्डनहून अमेरिकेत इकोनॉमी क्लासने प्रवास करण्याचे दर हे साधरण ६५० जॉर्डन दिनार ठेवले होते. तर क्राऊन क्लासचा दर हा २८०० दिनार ठेवण्यात आला होता. हे दर नेहमीच्या प्रवासापेक्षा कमीच होते. अमेरिकन निवडणुकांच्या धर्तीवर जॉर्डन एअर लाईन्सने दिलेल्या घसघसीत सवलतीची आणि अनोख्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.