Judge Criminal Courtroom Video: दुनिया गोल है… हे तुम्ही लहानपणापासून अनेकदा ऐकलं असेल. आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर आपल्याला अनेक लोक भेटतात. काही आयुष्यभर सोबत राहतात, तर काहींचा संपर्क केवळ बालपणापर्यंतच असतो. असं असलं तरी बालपणीच्या आठवणी नेहमीच आपल्या हृदयात घर करून राहतात, विशेषत: त्या पिढीसाठी जे सोशल मीडिया आणि इंटरनेटशिवाय मोठे झाले आहेत. तुमचेही असे अनेक मित्र शाळेत असताना असतील, ज्यांच्यासोबत तुम्ही दुपारचे एकत्र जेवण केले, खेळला बागडलात, शाळा सुटल्यावर त्यांच्यासोबत घरी गेलात… पण, ते मित्र आजही तुमच्यासोबत आहेत का?
कदाचित नाही ना… पण त्यांना तुम्ही विसरलात असं नाही, अजूनही काही मित्रांचे चेहरे आपल्या लक्षात असतातच. तो शाळेचा गणवेश, तो टिफिन बॉक्स आणि तो शाळेचा दरवाजा; सगळं काही आठवतं. आता विचार करा, ज्या मित्राचा गेल्या २०, ३० वर्ष काहीही संपर्क नाही, त्याला एवढे वर्ष भेटला नाहीत; तोच मित्र समोर आला तर… तुम्ही ओळखाल का? नक्कीच काही मित्र नेहमी लक्षात राहतात. असंच काहीसं या दोन लोकांसोबत घडलंय, ज्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यांची कहाणी ऐकून अवघे जग भावूक झाले आहे. सध्या याचा एक भावनिक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतंय. तुम्हीही हे पाहून नक्की भावूक व्हाल… संबंधित वृत्त aajtak संकेतस्थळाने दिले आहे.
शाळेतले दोन मित्र-मैत्रिणी जेव्हा असे समोरा-समोर येतात
ही कहाणी आहे शाळेतील दोन मित्र-मैत्रिणींची आर्थर बूथ आणि मिंडी ग्लेजरची… हे दोघे बालपणी एकाच शाळेत शिकले. आर्थरला लहानपणापासून न्यूरोसर्जन व्हायचं होतं. तो गणित आणि विज्ञानात खूप हुशार होता, तर मिंडीही खूप हुशार. तिला मोठेपणी पशुवैद्य बनायचं होतं, पण ती मोठी झाली आणि तिने वकील होण्याचं ठरवलं. ती लॉ स्कूलमध्ये गेली आणि एक सर्वोच्च वकील बनली. दोघांनी करिअरसाठी वेगवेगळे मार्ग निवडले आणि ती शाळेतील त्यांची शेवटची भेट होती. मात्र, सुरुवातीला हुशार असणाऱ्या आर्थरचं पुढे असं होईल असं कुणीही विचार केला नव्हता. शाळा संपली, दोघेही करिअरसाठी वेगवेगळे झाले आणि या दोघांची जवजवळ ३० वर्षांनी भेट झाली ती थेट कोर्टातच. दोघेही एकमेकांच्या विरूद्ध दिशेला होते. एका बाजूला कोर्टात न्यायाधीश म्हणून मुलगी मिंडी ग्लेजर, तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगार म्हणून आर्थर. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकाने मेहनतीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि आज न्यायाधीश पदावर विराजमान झाली. तर दुसरा वाईट वाटेवर गेल्यामुळे गुन्हेगार झाला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ३ वेळा अपयश! घर, नोकरी सांभाळून अभ्यास; ४२ व्या वर्षी मुलाबरोबर आईसुद्धा पास झाली स्पर्धा परीक्षा
हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, मात्र हे खरं आहे. ही भेट अशी होणार त्या दोघांनीही कधी विचार केला नव्हता. नेहमीप्रमाणे मिंडी न्याय करण्यासाठी न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसली. आजचा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय असेल असा तिने कधी विचारही केला नसेल. गुन्हेगाराच्या जागी उभ्या असलेल्या आर्थरला पाहून ती आश्चर्यचकित झाली. ती कसलाही विचार न करता त्याला पाहून म्हणाली की, तू तोच आहेस ना, ज्याच्यासोबत मी फुटबॉल खेळायची. पण, तू इथे कसा? हे ऐकून तो ढसाढसा रडू लागला. या दोघांमधील विचित्र भेटीचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मिंडीच्या शब्दांनी आयुष्य बदललं…
आर्थरला जुगार आणि ड्रग्जचे व्यसन होते. त्याने अनेक घरफोड्या केल्या होत्या. पोलिसांच्या हातूनही तो निसटला. सुनावणी सुरू झाली, तेव्हा तो आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्यासारखे वागत होता. पण, जेव्हा न्यायाधीशांनी म्हणजेच मिंडीने त्याला प्रश्न विचारला की तो नॉटिलस मिडल स्कूलमध्ये शिकत होता का? हे ऐकून आर्थर ढसाढसा रडू लागला. त्याला १० महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण, आता सगळं बदललं होतं. कोर्टात भेटलेला आर्थर आता तो नव्हता. त्याने तुरुंगात असताना भरपूर पुस्तकं वाचली होती. त्याला व्यवसायात रस निर्माण झाला. त्याने आयुष्याकडे नव्याने पाहण्याचं ठरवलं होतं. मिंडीच्या शब्दांनी आयुष्य बदललं असं तो म्हणतो.