भारतीय लोकं जुगाड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मग अगदी संकटात अडकलेल्या क्षणी असो किंवा दैनंदीन कामे सोप्पी करण्यासाठी असो जुगाड करुन काम करायची असल्यास भारतीयांची कल्पनाशक्ती सुसाट धावते असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशाच एका जुगाडू भारतीय कुटुंबाचा व्हिडीओ सध्या ट्विटवर व्हायरल होत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्वीट केल्याने अनेकांचे लक्ष या व्हिडीओकडे वेधले गेलेले आहे.

आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटरवर सक्रीय असतात आणि त्यांनी रिट्विट केलेले बहुतांश ट्विट अनेकदा चर्चेचा विषय बनतात. अशीच एक चर्चा सध्या सुरु आहे त्यांनी रिट्विट केलेल्या एका शेतकरी कुटुंबाच्या ‘डोकॅलिटी’ची. महिंद्रा यांनी रिट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये एका स्पेंल्डर मोटरसायकलचा उपयोग एक शेतकरी कुटुंब चक्क भुईमुगाच्या शेंगा रोपाच्या मुळापासून वेगळ्या करत आहेत. व्हिडीओत शेतकरी कुटुंबातील पाच ते सहाजण शेतातून उपटलेल्या भुईमुगाच्या शेंगा या हाताने न तोडता टू साईड स्टॅण्डवर बाईक लावून. गाडी सुरु ठेऊन मागील चाकाच्या मदतीने काढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ महिंद्रांच्या अविनाश नावाच्या एका फॉलोअरने त्यांना टॅग करून ट्विट केला आहे. या व्हिडीओत तो फॉलोअर म्हणतो की, ‘या जुगाडसाठी या शेतकऱ्याला पुरस्कार द्यायला हवा. आपल्याकडे अशा कल्पनांची कधीच कमतरता नसते. सलाम या कल्पनाशक्तीला. आणि विशेष म्हणजे या दुचाकीमध्ये कोणताही बदल न करता तीचा असा वापर या शेतकरी कुटुंबाने केला आहे.’

महिंद्रांनीही अविशानचा व्हिडीओ कोट् करुन त्याच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे. हा व्हिडीओ कोट् करताना महिंद्रा म्हणतात, ‘भन्नाट, हा आहे माझा भारत, काहीही वाया न घालवणे म्हणजे काटकसर. मग ती काटकसर कुठल्याही प्रकारची असो ऊर्जेचे किंवा यंत्राची.’

महिंद्रांच्या या ट्विटला शेकडोच्या संख्येने रिट्विट मिळाले आहेत तर हजारोंनी हे ट्विट लाईक केले आहे. तर अनेकांनी कमेन्ट करुन या कल्पनाशक्तीला सलाम केला आहे. पाहुयात महिंद्रांच्या ट्विटवर लोकं काय म्हणाले आहेत.

याला म्हणतात योग्य वापर

अतुल्य भारत

गरज ही शोधाची जननी आहे

जुगाडांचा देश

गाडीच्या नंबर प्लेटवरून तरी हा व्हिडीओ कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजते. अनेकांना ही कल्पना खूपच आवडल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला १२ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून लवकरच हा आकडा तेरा हजाराच्या वर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.