Jyoti Maurya Alok Kumar Viral Whatsapp Chats: ज्योती मौर्य व आलोक कुमार मौर्य या पती- पत्नीच्या वादाची देशभरात चर्चा आहे. SDM अधिकारी असणाऱ्या ज्योती मौर्य यांचे पती आलोक यांनी पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले, शिवाय ती घटस्फोट मिळवण्यासाठी हुंडा मागितल्याचे खोटे आरोप करत आहे अशी माहिती माध्यमांना दिली. आपण हलाखीत दिवस काढून पत्नीला (ज्योती) शिक्षणासाठी मदत केली आणि आता अधिकारी झाल्यावर तिचे अन्य एका ऑफिसरबरोबर सूत जुळले आहेत असेही आलोक म्हणाले. तर ज्योती यांनी हे सगळे आरोप खोडून काढले आहेत. काही दिवसांपासून मनीष व ज्योती यांच्या चॅट्सचे स्क्रिनशॉट्स व्हायरल होत आहेत ज्यावर आता उत्तर देताना ज्योती यांनी आलोक यांच्यावर पलटवार केला आहे.
आलोक माझ्याकडे ५० लाख मागतोय कारण…
ज्योती मौर्य यांनी आलोक कुमार याच्यावर हुंडा मागितल्याचा सुद्धा आरोप लावला होता. ज्यावर उत्तर देताना त्या म्हणतात की, “आमच्या लग्नाला सात वर्ष होऊन गेली आहेत. त्यामुळे आता हुंड्यासाठी छळ करण्यावरून लावलेली कलमे हटवण्यात येतील. पण मी तक्रार करताना पोलीसांना सांगितले होते की आलोकने माझ्याकडे ५० लाख रुपये, घर व फॉर्च्युनर गाडी याची मागणी केली होती. पोलिसांनी सुद्धा याच आधारावर हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार नोंदवून घेतली होती. आलोकने काही दिवसांपूर्वी माझ्याकडे हे प्रकरण समजुतीने मिटवण्यासाठी ऑफर पाठवली होती पण मी त्याच्याकडून कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेणारच आहे. “
काही दिवसांपूर्वी आलोकने सुद्धा ज्योती मौर्य व त्यांचा कथित बॉयफ्रेंड मनीष दुबे यांचे चॅट्स शेअर करून त्यावरूनच हे दोघे आपल्याला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. या चॅट्सवर उत्तर देताना ज्योती मौर्य यांनी सांगितले की, “मागील १० महिन्यापासून आलोकने माझे Whats App अकाउंटच हॅक करून ठेवले आहे. मी त्याच्या विरुद्ध आयटी ऍक्ट अंतर्गत तक्रारही केली आहे. तो व त्याचं कुटुंब सतत माझ्याकडे पैसे मागत आहे.”
दरम्यान, दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत ज्योती मौर्य यांनी आलोक आपले प्रायव्हेट फोटो लीक करण्याचा प्रयत्न करू शकतो अशी भीती वर्तवली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी माध्यमाशी बोलताना ज्योती यांनी आलोकवर सतत टोमणे मारून मानसिक छळ केल्याचा सुद्धा आरोप लगावला होता. आलोकने ग्रामपंचायत अधिकारी असल्याचे खोटे सांगून लग्न केले व जेव्हा त्याची खरी बाजू समोर आली तेव्हापासून तो छळ करत असल्याचे ज्योती यांचे म्हणणे आहे.