SDM Officer Jyoti Maurya Alok Kumar Case: ज्योती मौर्या व त्यांचे पती आलोक हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एसडीएम ज्योती मौर्या यांना अधिकारी बनल्यावर पतीला घटस्फोट देण्यावरून ट्रोल केले जात आहे. ज्योती यांचे पती म्हणजेच आलोक कुमार यांनी ज्योती यांच्या शिक्षणासाठी प्रचंड मेहनत व खर्च केला होता मात्र अधिकारी बनल्यावर अन्य एका अधिकाऱ्याच्या प्रेमात पडून ज्योती यांनी नवऱ्याकडून घटस्फोटाची मागणी केली जात असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. आलोक कुमार वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या सरकारी अधिकारी असलेल्या पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाविषयी माहिती दिली होती. आलोक कुमार यांनी पत्नीच्या अफेअरविषयी नेमकं काय सांगितलं होतं व हे प्रकरण काय जाणून घेऊया…
ज्योती मौर्या व आलोक कुमार वर्मा प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनुसार व आलोक यांनी सांगितल्याप्रमाणे, २००९ मध्ये त्यांना सफाई कर्मचाऱ्याची नोकरी मिळाल्यावर त्यांनी २०१० मध्ये ज्योती मौर्या नामक महिलेशी लग्न केले होते. या दाम्पत्याला दोन जुळ्या मुली सुद्धा आहेत. २०२० पर्यंत सर्वकाही ठीक होतं असं स्वतः आलोक यांनी सुद्धा म्हटलं आहे. मात्र याच वेळी मला हळूहळू संशय येऊ लागला होता. २१ डिसेंबर २०२२ ला ज्योती मौर्या या कामाच्या निमित्ताने लखनऊला जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी आलोक यांनी ज्योती यांच्या नकळत त्यांचा पाठलाग केला तेव्हा लक्षात आले की त्या त्यांच्या प्रियकरासह एका हॉटेलमध्ये रात्रभर थांबल्या होत्या.
आलोक यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, “मी २२ डिसेंबरला सकाळी थेट ज्योतीच्या खोलीत समोरच जाऊन उभा राहिलो, त्यावेळेस शेवटी ज्योतीने कबुली देत तिच्याबरोबर असणारा तरुण हा मनीष असल्याचे सांगत तिचे त्याच्यावर प्रेम आहे असेही म्हटले. त्यानंतर आमच्यातील वाद विकोपाला गेले. आता अशी स्थिती आहे की माझीच बायको मला धमक्या देत आहे की तू घटस्फोट दे नाहीतर मी तुझ्यासह तुझ्या कुटुंबालाही रस्त्यावर आणेन, ३७६ कलम लावून शिक्षा भोगायला लावेन, मी खूप चिंतेत आहे असं वाटतं की थेट ट्रेनखाली जाऊन जीव द्यावा. “
हे ही वाचा<< ज्योती मौर्यसारखी सोडून जाशील म्हणत बायकोचं शिक्षण बंद करणाऱ्यांना पहिल्यांदाच ज्योती यांचं उत्तर; म्हणाल्या…
दरम्यान, ज्योती मौर्या व आलोक कुमार यांच्या घटस्फोटाचा खटला सध्या कोर्टात सुरु असल्याचे ज्योती यांनी सांगितले. शिवाय ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकजण दोघांमध्ये पदाचे अंतर असल्याने घटस्फोट घेत असल्याचे दावे खोडून काढले आहेत. हा निर्णय कौटुंबिक वादातून घेतला आहे आणि याची सोशल मीडियावर चर्चा करण्याची गरज वाटत नाही असेही ज्योती मौर्या यांनी म्हटले आहे.