आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फूड व्लॉगिंग हा एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. या फूड व्लॉगिंग व्हिडिओंमध्ये अनेकदा फूड व्लॉगर विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत असतात. विविध प्रकारच्या पदार्थांची चव घेताना फूड व्लॉगर अनेकदा खाद्य पदार्थ विक्रेत्यांशी संवादही साधतात. ज्याचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. तसेच हा ट्रेंड फूड व्लॉगर्सचे फॉलोवर्स वाढवण्यासह खाद्य पदार्थ विक्रेत्यांची लोकप्रियता देखील वाढवण्यास मदत करतात. रस्त्याच्या कडेला असलेले भोजनालय असो किंवा मोठे रेस्टॉरंट असो, अनेक विक्रेते या फूड व्लॉग्समुळे लोकप्रिय झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. परंतु सध्या सोशल मीडियावर एका फूड व्लॉगरचा आणि कचोरी विक्रेत्याचा विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोकांना दोघांपैकी नेमकी कोणाची बाजू घ्यायची हा प्रश्न पडला आहे.
कोलकातामधील व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कचोरी बनवताना दिसत आहे. यावेळी एक फूड व्लॉगर या कचोरी विक्रेत्याला त्याच्या कामाबद्दल प्रश्न विचारतो. यावर कचोरी विक्रेता संतापल्याचं दिसत आहे. फूड व्लॉगर कचोरी विक्रेत्याला विचारतो, “ही भाजी तुम्ही बनवता का?” कचोरी बनवत असलेला दुकानदार उत्तर देताना म्हणतो, “तुम्ही बनवता का म्हणजे आम्हीच बनवणार ती काय जन्माला येते का, आम्ही नाही तर कोण बनवणार? यावेळी व्लॉगर म्हणतो, ‘कामगार बनवत नाहीत का?’ यावर दुकानदार म्हणतो, सगळं काम मालकालाच करावी लागतात आणि आम्ही धंदा करायला बसलो आहे. तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला नव्हे. निवांत वेळेत ये मग बोलू,’ असं दुकानदार म्हणताच व्लॉगर त्याला तुम्ही नाराज झालात का?” असं विचारतो. या दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
हेही पाहा- ‘ती’ ने असं काही वेड लावलं की स्कॅमर शेवटी भडकून शिव्याच देऊ लागला; Video पाहून तुम्हीही शिकून घ्या
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
उत्कर्ष मिश्रा नावाच्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, चॅटवाले भैया म्हणतायत, “मेरे सामने झुक के रहना पडेगा.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, “हे मजेशीर आहे की नाही ते व्लॉगरला विचारा.” तर या व्हिडीओवर अनेकांनी स्माईल इमोजी शेअर करत हा व्हिडीओ मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी चॅट विक्रेत्याच्या असभ्य वर्तवणुकीवर टीका केली आहे. तर काही लोकांनी हे व्लॉगर खूप त्रास देतात आणि फुकटचं खायला येतात असंही म्हटलं आहे.