Kalachauki mahaganpati video: गणपती बाप्पा मोरया…, गणेश गणेश मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण काहीच दिवसांत आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. राज्यभरात गणपती आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळं मंडप वगैरे बांधून मूर्तीभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीला लागले आहेत. खरं तर गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून २३ दिवस बाकी आहेत. पण, मुंबईत काही ठिकाणी आताच गणेशमूर्त्यांचं आगमन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीचे ११ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात भक्तांनी स्वागत केलं. हजारोंच्या संख्येने भक्त, तरुण मंडळी यावेळी एकत्र आली होती. मात्र, या गर्दीच्या उत्साहामागचं भीषण वास्तव तुम्ही पाहिलं तर पुन्हा कोणत्या आगमनाला जाण्याआधी शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप्पाच्या आगमनाला जाण्याआधी हे पाहा

काळाचौकीमधील महागणपतीचं हे थरारक आगमन पाहून खरंच तुम्हीसुद्धा अवाक् व्हाल. दुपारी सुरू झालेल्या या आगमन सोहळ्यासाठी रविवारी सकाळपासून गणेशभक्तांनी हजेरी लावली होती. तरुण-तरुणींचे ग्रुप्स चिंचपोकळी, करी रोड स्थानकांवर मोठमोठ्या आवाजात किंचाळत-ओरडत मिरवणुकीच्या दिशेने जाताना दिसून आले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती आणली जातेय, त्या मार्गावर प्रचंड गर्दी आहे. लोकांना साधं उभं राहायलाही जागा नाहीये. अशातच चेंगरा-चेंगरीची शक्यता असताना तिथे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणी गर्दीमध्ये चेंगरल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अशात गर्दीमुळे काहीच करता येत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तरी काही जण या तरुणींना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

सोशल मीडीयावर अपडेट्सची घाई

आगमन सोहळ्यादरम्यान केवळ दुभाजकांवर मंडळाचे कार्यकर्ते नजरेस पडले, ही संख्या हजारोंच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. गर्दीचे व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी दुचाकी पार्क केलेल्या दिसून आल्या. बाप्पाची झलक दिसताच रेटारेटी करणाऱ्या तरुणाईमुळे अनेकांना मुका मार बसला. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना अधिक त्रास झाल्याचे दिसले. तसेच इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, ट्विटर अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावर आगमन सोहळ्याचे अपडेट्स टाकण्यासाठी तरुणाई प्रचंड घाई करताना दिसून आली. सर्वात आधी या आगमन सोहळ्याचे अपडेट्स कोण शेअर करतं, फोटो कोण शेअर करतं याविषयीची काहीशी स्पर्धा तरुणाईत दिसून आली. त्यामुळे सोशल मीडियावर अपडेट्सची घाई न करता जीव सांभाळून मोबाइलचा वापर करणे गरजेचे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> व्यक्तीनं धमकी दिली अन् पुढच्याच क्षणी मेट्रो स्टेशनच्या छतावरुन मारली उडी; श्वास रोखणारा VIDEO व्हायरल

mumbaiche_vadya_pathak नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalachowki cha mahaganpati aagman sohala 2024 rush in mahaganpati aagman sohala shocking video goes viral on social media srk