Ayodhya Ram Mandir : अयोध्यातील भव्य, ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात आज अखेर रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. अनके वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला आज मंदिरात विराजमान झाले. या भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे केवळ भारत देशच नव्हे, तर संपूर्ण जग साक्षीदार झाले आहे. अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या पाच वर्षांच्या बालस्वरूपाची मूर्ती बसवली आहे; जी काळ्या दगडापासून बनलेली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, अयोध्येशिवाय नाशिकमधील एका मंदिरातही श्रीरामाची अशीच कृष्णवर्णीय मूर्ती आहे. काळाराम मंदिर, असे या मंदिराचे नाव आहे. चला जाणून घेऊ या मंदिराबद्दल…
काळाराम मंदिर का आहे खास?
काळाराम मंदिराचे नाव देवाच्या कृष्णवर्णीय मूर्तीवरून घेण्यात आले आहे. कालांतराने याचे शाब्दिक भाषांतर ‘काळा राम’ असे झाले. या मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाव्यतिरिक्त सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्याचबरोबर मुख्य गेटवर भगवान हनुमानाची कृष्णवर्णीय मूर्ती आहे.
पंतप्रधान मोदींनी हेलिकॉप्टरमधून टिपला अयोध्येतील अद्भूत नजारा; पाहा VIDEO
श्री काळाराम मंदिर संस्थानाच्या वेबसाइटवरील महितीनुसार, हे मंदिर १७९२ मध्ये सरदार रंगाराव ओढेकर यांच्या प्रयत्नांतून बांधले गेले. असे म्हणतात की, सरदार ओढेकर यांना गोदावरीत रामाच्या कृष्णवर्णीय मूर्तीचे स्वप्न पडले होते. त्यानंतर त्यांनी या मूर्ती नदीतून बाहेर काढल्या आणि मंदिरात विराजमान केल्या. ज्या ठिकाणी मूर्ती सापडल्या, त्या ठिकाणाचे नाव रामकुंड असे होते. येथे श्रीरामाची दोन फुटी मूर्ती स्थापित आहे. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे १२ वर्षे लागली.
मंदिरात सध्या आहेत १४ पायऱ्या
श्री काळारामाच्या मुख्य मंदिराला १४ पायऱ्या आहेत. या पायऱ्या श्रीरामाच्या १४ वर्षांच्या वनवासाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचबरोबर या मंदिरात ८४ खांब आहेत; जे ८४ लाख प्रजातींचे चक्र दर्शवतात. जो माणूस म्हणून जन्माला येण्यासाठी पूर्ण करावा लागतो, त्याशिवाय येथे एक खूप जुने झाड आहे. त्या झाडाखाली दगडावर भगवान दत्तात्रेयांच्या पावलांचे ठसे आहेत.
पंचवटी विशेष का आहे?
नाशिकचे पंचवटी हे विशेष स्थान आहे. कारण- आपल्या वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी पंचवटीच्या दंडक जंगलात झोपडी बांधली होती आणि तेथे काही दिवस वास्तव्य केले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. येथे पाच वटवृक्ष आहेत. त्यामुळे याला पंचवटी म्हणतात. याच ठिकाणी लक्ष्मणजींनी शूर्पणखाचे नाक कापले होते. तसेच रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, असेही सांगितले जाते.
काळाराम मंदिर कुठे आहे?
नाशिकच्या पंचवटी तीर्थक्षेत्रात भगवान श्रीरामाचे मंदिर आहे. तुम्ही येथे बस, ट्रेन, विमानाने जाऊ शकता.
काळाराम मंदिरात दर्शनाची वेळ
काळाराम मंदिराला दररोज सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत भेट देता येते.