Kalyan Railway Station Scam Video : सोशल मीडियावर सध्या कल्याण रेल्वेस्थानकातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथे तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्याकडून प्रवाशांची मोठी लूट सुरू आहे. एका तिकीटमागे प्रवाशांकडून जवळपास ३० रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतला जातोय, इतकं करूनही तिकीट खिडकीवरील कर्मचारी ती गोष्ट मान्य करण्यासही तयार नाही, यावरून एक प्रवासी त्याला जाब विचारताना दिसतोय. सध्या या घटनेचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नक्की संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ…
तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांना फक्त तिकीटवरील नमूद रक्कम घेण्याचा अधिकार असतो. ते प्रवाशांकडून कोणत्याही जादा रकमेची मागणी करू शकत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत. मात्र, कल्याण रेल्वे स्टेशनवरील एका तिकीट काउंटरवर प्रवाशांची मोठी लूट सुरू आहे. इथे एका तिकीट काउंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे ३० रुपये एक्स्ट्रा चार्ज घेताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे एका प्रवाशाने याबाबत विचारणा केली असता, तो त्याच्याशी अरेरावीची भाषा करीत होता.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक प्रवासी तिकीट काउंटरवर नेत्रावली एक्स्प्रेस या ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरवर उभा होता. यावेळी त्याच्या लक्षात आले की, तिकीट काउंटरवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे ३० रुपये अधिकचे उकळतोय. यावरून तो त्या एका कर्मचाऱ्याला विचारतो की, तुम्ही प्रत्येक प्रवाशाकडून एका तिकिटामागे ३० -३० रुपये एस्क्ट्रा का घेत आहात. त्यावर तो कर्मचारी आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव, असे म्हणत त्याचे ३० रुपये परत करतो. पण, त्याने अशा प्रकारे याआधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ३० रुपये अधिकचे वसूल केले होते.
त्यामुळे प्रश्न विचारणारा प्रवासी पुन्हा तोच प्रश्न करत म्हणतो की, आधी तुम्ही दोन जणांकडून अधिकचे पैसे घेतले आणि आता या प्रवाशाकडूनही घेत होता. त्यावर तो कर्मचारी त्या प्रवाशाच्या प्रश्नांना बगल देत बाजूला होण्यास सांगतो आणि त्यानंतर चुकून झाले, असे म्हणतो. त्यावर प्रवासी त्याला पुन्हा ठणकावून विचारतो की, तुमच्याकडून हे एकदा-दोनदा चुकून होऊ शकते; पण सतत का होतेय? यावर तो कर्मचारी आपला गुन्हा लपवण्यासाठी काहीच उत्तर न देता, प्रवाशालाच काउंटरवरून बाजूला होण्यास सांगतो. पण, तो प्रवासी बाजूला न होता, वारंवार त्याला विचारतो की, चुक एकदा होऊ शकते ना; वारंवार कशी होऊ शकते. यावर तो कर्मचारी तुझ्याकडून तर अधिकचे पैसे घेतले नाही ना, असे उलट उत्तर देतो.
त्यावर ज्या प्रवाशाकडून कर्मचाऱ्याने ३० रुपये अधिकचे घेतले, तो म्हणतो संतापून म्हणतो की, मी मागितल्यावर तू माझे ३० रुपये परत दिसेल. अशा प्रकारे कर्मचाऱ्याने एकामागून एक आलेल्या तीन प्रवाशांकडून प्रत्येकी ३० रुपये अधिकचे घेतले. कल्याण रेल्वे स्टेशन तिकीट काउंटरवरील हा कर्मचारी प्रयागराजचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एका तिकीटमागे ३० रुपये अधिकचे वसूल करीत असल्याचा दावा व्हिडीओ शूट करणाऱ्या प्रवाशाने केला. पण तो फक्त प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडूनच अशाप्रकारे अधिकचे पैसे वसूल करतोय की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता केली जात आहे. प्रवाशांनी या कर्मचाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत कडक कारवाईची मागणी केली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडीओ @dhirajvishwakarma91 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स करत आपापले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले की, “Petty Cash check करायला पाहिजे याच्याजवळची”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “कल्याणला ३० आहे; अकोल्याला ५ रु. एक्स्ट्रा घेतात चिल्लर नाही म्हणून”. अशा प्रकारे लोकांनी अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. तर, अनेकांनी विविध स्थानकांवरील तिकीट काउंटरवर सुरू असलेल्या अशा फसवणुकीच्या घटनांबाबत वक्तव्य केले आहे.