माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने सगळ्या राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एक चतुरस्र राजकारणी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. क्रीडा, चित्रपट, व्यापार अशा सर्वच क्षेत्रांतून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना देशातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या अमुलनेही त्यांच्या अनोख्या पद्धतीने अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अमुलच्या जाहिराती या शब्दांशी खेळ करुन त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या संदेशासाठी अधिक प्रसिद्ध असतात. त्यामुळे अमुलच्या जाहिराती अनेकदा चर्चेचा विषय बनतात. भाजपाचं निवडणूक चिन्ह कमळ आहे, तर अरुण जेटलींनी त्यांच्या जीवनात विविध पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता. याच्याच आधारे हिंदीतून अमुलने ‘कमल के नेता, कमाल के अचिव्हमेंट्स’ अशा आशयाचा संदेश पोस्टरद्वारे दिला आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरुन अमुलने हे पोस्टर शेअर केलं असून नेटकऱ्यांच्या ते चांगलंच पसंतीस पडलंय.
अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना 9 ऑगस्टपासून एम्सच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवारी(दि.24) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या खांद्यावर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.