इंजिनिअरचं डोकं कधी, कसं, कुठे चालेल याचा काही नेम नाही. आता या तरूणाचंच बघा ना! आपलं डोकं लढवून त्यानं चक्क एक रुपयांत अमेरिकेला जायचं विमानाचं तिकीट काढलंय. आता ते यानं कसं शक्य केलंय याची उत्सुकता तुम्हाला देखील असेल ना! तर हा २० वर्षांचा कनिष्क सजनानी एथिकल हॅकर आहे. वेगवेगळ्या बुकिंग पोर्टलवर अभ्यास करताना त्याला या पोर्टलच्या तिकिटिंग सिस्टममध्ये काहीतरी घोळ असल्याचं लक्षात आलं. एअर इंडियाच्या ऑनलाइन पोर्टलवर काम करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कोणीही विनामूल्यपणे या विमानसेवेने जगभरात प्रवास करू शकतो. कमकुवत पेमेंट सिस्टिममुळे एखादा हॅकर सहज आपल्या मनाप्रमाणे तिकिटांचे दर बदलू शकतात किंवा मोफतही प्रवास करू शकतो.

कनिष्कने स्वत: एअर इंडियाच्या पोर्टलवरून सॅन फ्रॅन्सिस्कोचे तिकीट चक्क एक रुपयात काढले. तर स्पाईसजेटच्या बुकिंग अॅपवरून गोव्याच्या तिकिटासाठी फक्त चार रुपयेच त्याने मोजले. इतकंच नाही तर सिस्टिममध्ये असलेल्या घोळामुळे त्याच्या अकाऊंटमध्ये दोन हजार रुपयेदेखील जमा झाले. तेव्हा विमानसेवांच्या इतक्या कमकुवत प्रणालीमुळे कोणीही त्याचा गैरवापर करू शकतो हे कनिष्कच्या लक्षात आले. ही चूक भविष्यात कंपन्यांना महागात पडू शकते, यासाठी कनिष्कने ई-मेलच्या माध्यमातून कंपन्यांशी संवाद साधला आणि ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Story img Loader