Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. सकाळपासून देशभरातील नागरिकांना कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. मतमोजणीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे तर काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. एकीकडे निवडणुकीत भाजपाच्या पराभवाच्या चर्चा सुरु असतानाच, कर्नाटकातील भाजपा कार्यालयात साप घुसल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा साप शिगगाव येथील भाजपा कार्यालयात घुसला होता. महत्वाची बाब म्हणजे हा साप भाजपा कार्यालयात घुसला तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान या सापाची सुटका करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही अनर्थ घडला नाही. मात्र, हा साप दिसताच कार्यालयाच्या परिसारात एकच गोंधळ उडाल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.
भाजपा कार्यालयात साप शिरल्याचा व्हिडीओ एएनआयने ट्विट केला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, अनेक युजर्सनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, हा साप आपले थकीत पैसे वसूल करण्यासाठी आला असेल. तर आणखी एकाने लिहिलं आहे, “काय योगायोग आहे” तर तिसऱ्या व्यक्तीने, “भाजपावर हनुमानजी नाराज आहेत, शिवजीही संतापल्याचं दिसत आहेत,” अशी कमेंट केली आहे.
देशभरात कर्नाटक निकालाची चर्चा –
सध्या देशभरात कर्नाटक विधानसभा निकालाची चर्चा सुरु आहे. अशातच भाजपा कार्यालयात घुसल्याची चर्चाही जोरदार सुरु झाली आहे. कर्नाटक विधामसभेच्या २२४ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतपर्यंत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून २२४ जागांपैकी १३६ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ६३ जागांवर आघाडीवर आहे.