Tobacco Ban in Government Offices : सरकारी कार्यालयांमध्ये अनेकदा सर्रासपणे काही कर्मचारी गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाताना किंवा सिगारेट ओढताना दिसतात. या कर्मचाऱ्यांना कोणाचाही धाक नसतो. तसेच अशा गोष्टीला विरोध करणाऱ्यालाच चार गोष्टी सुनावल्या जातात. पण आता सरकारी कार्यालयांमध्ये अशा गोष्टी करणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण- कर्नाटक सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार सरकारी कार्यालयांमध्ये सिगारेट ओढणे, गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यावर बंदी घातली आहे. त्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फलक लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटक सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये सिगारेट ओढण्यासह सरकारी कार्यालय आणि परिसरात सिगारेट ओढण्यास आणि कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास बंदी घातली आहे. कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने (डीपीएआर) जारी केलेल्या आदेशात असे स्पष्टपणे लिहिले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“तुम्हाला सगळचं फ्री पाहिजे का…” भर ट्रेनमध्ये टीटीने पोलिसाला फटकारले; VIDEO पाहून युजर्सचा संताप
सरकारी कार्यालयात सिगारेट ओढणारे अडचणीत
सरकारी कार्यालये आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याचे आदेशात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी आणि सार्वजनिक व सरकारी कर्मचाऱ्यांचे धूम्रपानापासून संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला धूम्रपानासह तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास शासकीय कार्यालये आणि कार्यालयाच्या परिसरात सक्त मनाई आहे.
या सूचनांचे उल्लंघन करून कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयात किंवा कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा, पान मसाला इ.) धूम्रपान करताना किंवा सेवन करताना आढळून आल्यास, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आदेशपत्रात असेही लिहिले आहे की, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अशा उत्पादनांचे सेवन पूर्णपणे प्रतिबंधित आहे. कर्नाटक राज्य नागरी सेवा नियम, २०२१ च्या नियम-३१ मध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मादक पेय किंवा मादक पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे.