बंगळुरुत मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (MIT) प्राध्यापकाने भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला ‘दहशतवादी’ अशी हाक मारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडीओत विद्यार्थी प्राध्यापकावर संतापलेला दिसत असून ‘दहशतवादी’ उल्लेख केल्याबद्दल स्पष्टीकरण मागत आहे. शुक्रवारी ही घटना घडली. “मुस्लीम असणं आणि रोज अशा गोष्टींचा सामना करणं काही सोपं नाही,” असं विद्यार्थी सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
यानंतर प्राध्यापक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्याला ‘तू माझ्या मुलासारखा आहेस’ असं सांगतात. यावर विद्यार्थी ‘नाही. जर वडील तसं म्हणाले तर ती त्यांची जबाबदारी आहे. हे हास्यास्पद नाही,’ असं खडसावतो.
“तुम्ही तुमच्या मुलाशी असं बोलाल? तुम्ही त्याला दहशतवादी म्हणाल का? मग इतक्या मुलांसमोर तुम्ही मला अशी हाक कशी काय मारु शकता? हा वर्ग असून, तुम्ही एक शिक्षक आहात. तुम्ही असा उल्लेख करु शकत नाही,” असं विद्यार्थी सांगतो.
यानंतर शिक्षक विद्यार्थ्याची माफी मागताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एमआयटीने प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली असून, अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे.
मनिपाल विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाच्या संचालकांनी सांगितलं आहे की “आम्ही सर्व धर्म समभाव आणि संपूर्ण जग एक कुटुंब असल्याचं मानत असून अशा घटनांचा निषेध करतो. यासंबंधी योग्य ती कारवाई करण्यात आली असून, सर्व पावलं उचलली जात आहेत. विद्यार्थ्याला समुदेशन दिलं जात असून, प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे”.
दरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकामध्ये हा संवाद सुरु होण्याचं नेमकं कारण काय आहे याचा खुलासा विद्यापीठाने केलेला नाही. “नेहमीच्या वर्गात हा प्रकार झाल्याने त्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. यामुळे आम्ही सुओ मोटो कारवाई केली आहे. हे अपेक्षित नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. हा व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केला याचीही आम्हाला कल्पना नाही,” असं विद्यापीठाने सांगितलं आहे.