बंगळुरू येथील ‘मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) या शैक्षणिक संस्थेत प्राध्यापकाने एका मुस्लीम विद्यार्थ्याला त्याच्या नावावरून कसाबसारखा दहशतवादी म्हटलं. यानंतर विद्यार्थ्याने प्राध्यापकावर आक्षेप घेतला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ट्विटरवर कसाब हा हॅशटॅग (#Kasab) ट्रेंड झाला आहे.
वर्ग सुरू असताना प्राध्यापकाने विद्यार्थ्याला त्याचं नाव विचारलं. त्याने आपलं नाव सांगितलं आणि ते मुस्लीम नाव असल्याचं ऐकून प्राध्यापकाने ‘ओके, म्हणजे कसाबप्रमाणे तर’ असं वक्तव्य केलं. आपली तुलना मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबशी झाल्याचं ऐकताच संबंधित मुस्लीम विद्यार्थ्याने यावर गंभीर आक्षेप घेतला. यावरूनच हा विद्यार्थी आणि प्राध्यापकामध्ये शाब्दिक वाद झाला. हे सुरू असताना वर्गातीलच एका विद्यार्थ्याने ही घटना मोबाईल कॅमेरात शुट केली. तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
वादानंतर प्राध्यापकाने उत्तर दिलं की, “तू माझ्या मुलासारखा आहेस.” त्यावर संबंधित विद्यार्थी म्हणाला “तुम्ही तुमच्या मुलाशी असं बोलू शकता का? तुम्ही त्याला दहशतवादी म्हणू शकता का? इतक्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही मला असं कसं काय म्हणू शकता? हा एक वर्ग आहे आणि तुम्ही प्राध्यापक आहात.“
हेही वाचा : Video: हात धरला, तोंड खेचलं आणि बघ्यांनी मला.. दक्षिण कोरियातील तरुणीने सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव
विद्यार्थ्याच्या या प्रत्युत्तरानंतर संबंधित शिक्षक व्हिडीओमध्ये माफी मागताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एमआयटीने संबंधित प्राध्यापकाला निलंबित केलं असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.