जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमुळे मोठा तणाव निर्माण झाला असताना दहशतवाद्यांचा Kashmiri Militants एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दहशतवादी क्रिकेट खेळताना दिसत आहेत. एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये पाच तरुण क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या तरुणांनी एके-४७ रायफलचा वापर स्टम्प म्हणून केला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओत दिसणारे दहशतवादी अगदी रिलॅक्स मूडमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

दहशतवादी क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक उर्दू गाणेदेखील ऐकू येते आहे. दहशतवादी खांद्याला बंदूक लावून क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा व्हिडिओ शेअर केला जातो आहे. हल्ला केल्यानंतर दहशवादी अतिशय निवांत असतात, हे दाखवून देण्यासाठी या व्हिडिओचा वापर करण्यात येतो आहे. काल (गुरुवारी) हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. सोमवारी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता, तर १५ जण जखमी झाले होते.

अमरनाथ यात्रेवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा काश्मीरमधून जोरदार निषेध करण्यात आला होता. राजकीय नेते, फुटिरतावादी नेते यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र संताप केला होता. श्रीनगरमध्ये विद्यार्थी, व्यापारी आणि अनेक सामाजिक संघटनांनी हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढली होती. यासोबतच अनेक देशांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

काश्मीरमधील दहशतवाद्यांकडून याआधीही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीने त्याच्या १० साथीदारांसोबतचा फोटो मागील वर्षी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर बुरहान वानी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ठार झाला. यानंतर काश्मीर खोऱ्यात बराच काळ अशांततेचे वातावरण होते. बुरहानला ठार करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात जवळपास १ हजार पोलीस आणि स्थानिक लोक जखमी झाले होते.

Story img Loader