Kedarnath Helicopter Crash Video: उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये शनिवारी हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. भारतीय दलाचे खराब झालेले क्रिस्टल एव्हिएशन हे हेलिकॉप्टर MI-17 या हेलिकॉप्टरला लटकवून गौचर धावपट्टीवर नेले जात होते. मात्र, याचदरम्यान जुने हेलिकॉप्टर मंदाकिनी नदीत कोसळले. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी सातच्या सुमारास केदारनाथ आणि गौचरदरम्यान ही दुर्घटना घडली. थोड्या अंतरावर जाताच क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरच्या वजनामुळे आणि वाऱ्याच्या प्रभावामुळे MI-17 हेलिकॉप्टरचा तोल अनियंत्रित होऊ लागला, यानंतर काही सेकंदात क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरने काहीवेळ हवेत घिरट्या घेत हेलकावे खाल्ले आणि थारू कॅम्पजवळ आल्यावर लिंचोली नदीत कोसळले. या घटनेच्या व्हिडीओत तुम्ही हे थरारक दृश्य पाहू शकता.
क्रिस्टल एव्हिएशनचे खराब झालेले हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी MI-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने गौचर येथे नेले जात होते. यावेळी वायर तुटून हेलिकॉप्टर खाली पडले. सुदैवाने हेलिकॉप्टर लोकवस्तीच्या परिसरात पडले नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
Read More Today’s News : घरातून येऊ लागला भयानक आवाज; कोपऱ्यातील बॅग उचलताच दिसले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम
या दुर्घटनेनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल (SDRF) पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याचा एसडीआरएफच्या जवानांनी शोध घेत ते उचलण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी किंवा उपकरणे नव्हती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही; पण पडलेल्या हेलिकॉप्टरचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अफवा पसरवू नका, असे आवाहन एलडीआरएफने सर्व लोकांना केले आहे.
केदारनाथमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड (Uttarakhand Kedarnath MI-17 Helicopter)
या वर्षी यात्रेच्या सुरुवातीला २४ मे रोजी केदारनाथ धाम येथे क्रिस्टल हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, यावेळी प्रवासी या हेलिकॉप्टरमधून केदारनाथ दर्शनासाठी जात होते. पण, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी होते, मात्र त्यावेळीही कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. मात्र, आज हे हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी नेत असताना अपघातग्रस्त झाले. हे एक खाजगी हेलिकॉप्टर होते आणि पूर्वी केदारनाथ मंदिरात प्रवाशांना नेण्यासाठी वापरले जात होते.