प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी केनियामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या देशात प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून जर कोणी प्लॅस्टिक पिशवी वापरताना आढळल्यास २४ लाख ३३ हजारांहून अधिक किंमतीचा दंड होऊ शकतो. हा दंड भरणे शक्य नसल्यास ४ वर्षांसाठी कारागृहात रहावे लागू शकते. अशाप्रकारे प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणे पर्यावरणाच्यादृष्टीने फायद्याचे ठरु शकते असेही केनियाच्या सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराबरोबरच त्यांच्या उत्पादनावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे देशातील तब्बल ८० हजार कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार केनियामध्ये एका महिन्याला तब्बल २ कोटी ४० लाख प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. अनेक अफ्रिकन देशांमध्ये प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे केनियामध्ये घेतला गेलेला निर्णय जगात महत्त्वाचा मानला जात आहे. सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडील प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
केनियामध्ये आणि अनेक अफ्रिकन देशांमध्ये प्लॅस्टिकमुळे निर्माण होणार कचरा ही अतिशय मोठी समस्या आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या अनेक प्राणीही खातात त्यांमुळे त्यांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. याशिवाय, एक प्लॅस्टीकची पिशवी नष्ट होण्यासाठी साधारण २० ते १ हजार वर्षांचा कालावधी लागतो. केनियामध्ये आता नागरिकांना घराबाहेर पडताना स्वतःची पिशवी बाळगण्याची सवय लागली आहे. कापडी, कागदी अशा विविध प्रकारच्या पिशव्या वापरात आल्या आहेत. याशिवाय, विदेशी नागरिकांना विमानतळावरच आपल्याकडील प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा कराव्या लागणार आहेत.