Kerala Ambulance Viral Video : कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सायरन वाजवत रस्त्यावरून वेगाने निघालेल्या रुग्णवाहिकेचा मार्ग अडवल्याची एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. हे अमानवी वर्तन करणाऱ्या चालकाविरोधात आता पोलिसांनी कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा एक कारचालक दूरपर्यंत रस्ता अडवताना दिसत आहे. या घटनेत रुग्णवाहिकेच्या चालकाने वारंवार हॉर्न वाजूनही तो कारचालक बाजूला हटला नाही. या प्रसंगी रुग्णावहिकेतील सहायकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केरळ पोलिसांनी संबंधितावर कारवाई केली आहे.
कार चालकाने काही केल्या रुग्णवाहिकेला दिला नाही रस्ता
k
k
केरळच्या चालकुडी येथे ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. या रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता, त्याला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक होते. त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालक सतत सायरन व हॉर्न वाजवीत रस्त्याने वेगात पुढे जात होता. यावेळी जवळपास सर्वच वाहनांनी त्या रुग्णवाहिकेस जाण्यास रस्ता मोकळा करून दिला; पण मारुती सुझुकी सियाज कार काही रुग्णवाहिकेसमोरून बाजूला झाली नाही. रुग्णवाहिकेच्या चालकाने हॉर्न, सायरनद्वारे त्याला सातत्याने इशारा देऊनही कारचालक त्याला पुढे जाण्यासाठी रस्ताच देत नव्हता. रुग्णवाहिकेला वेगाने पुढे येत असल्याचे पाहून कारचालकही त्याच वेगाने रुग्णवाहिकेच्या पुढे येत होता; पण तो काही केल्या रुग्णवाहिकेला रस्ता देत नव्हता. कारचालकाची ही हटवादी अडवणूक पाहून, रुग्णवाहिकेतील सहायकाने त्याची कृती रेकॉर्ड केली.
रुग्णवाहिकेची अडवणूक, पोलिसांनी ठोठवला ‘इतक्या’ लाखांचा दंड
e
u
h
त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पाहून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी कारमालकाचा शोध घेत, थेट त्याचे घर गाठले आणि त्याला दोन लाखांचा दंड ठोठावला. तसेच त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
मात्र, सोशल मीडियावर या कारवाईबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे; तर अनेकांनी, पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
u
व्हायरल व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका युजरने लिहिलेय की, नितीन गडकरीजी तुम्ही कृपया सुनिश्चित केले पाहिजे की, रस्ता सुरक्षा नियम आणि कायद्यांचा एक भाग म्हणून, रुग्णवाहिकांना रस्ता देणे ही एक महत्त्वाची बाब आहे आणि जे रस्ता देत नाहीत, त्यांना शिक्षा आहे. काल मी अशाच एका घटनेचा साक्षीदार होतो जेव्हा एका रुग्णवाहिकाचालकाला मार्ग मिळविण्यासाठी हॉर्न वाजवावा लागला. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, अशा अमानवी आणि अपमानास्पद वागणुकीतून आपल्या काही देशवासीयांमध्ये नागरी भावनांचा अभाव असल्याचे दिसून येते. हे खरोखर लाजिरवाणे आहे; देव त्यांना मदत करो!