‘भगवान जब देता है छप्पर फाड के देता है’, ही म्हण अगदी तंतोतंत खरी झाली आहे, केरळमधील एका रिक्षाचालकाच्या बाबत. केरळमधील एका तीस वर्षीय रिक्षा चालकाचा लॉटरी लागली आहे. शनिवारी या रिक्षा चालकाने लॉटरीचे तिकीट काढलं होते. रविवारी या रिक्षाचालकाला २५ कोटी रुपयांची बंपर लॉटरी लागली आहे.
अनूप बी असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. अनूप बी श्रीवरहम येथील रहिवासी असून, तो एका हॉटेलमध्ये कामास होता. मात्र, कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी अनूपने रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. अनूपला मलेशियातील एका हॉटेलमध्ये काम करण्यास जायचे होते. त्यासाठी त्याला पुढील आठवड्यात व्हिसा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसेच, त्यासाठी त्याने कर्जही काढले होते. मात्र, ओणमनंतर रविवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालात TJ750605 क्रमांकाला २५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे घोषित करण्यात आले. ती लॉटरी अनूपने खरेदी केली होती.
लॉटरी जिंकल्यानंतर अनूप म्हणाला, “माझ्याकडे लॉटरी खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. मी मुलाने जमा केलेल्या पैशातून शनिवारी खरेदी केली. रविवारी २५ कोटींचे बक्षीस जिंकल्याची माहिती मिळाली. मी एका सहकारी बँकेकडून ३ लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. ते मंजूरही झाले होते. पण, आता मला कर्ज नको असल्याची माहिती त्यांना दिली आहे.” दरम्यान, अनूपला कर कपातीनंतर १५ कोटी रुपये मिळणार आहेत.