झाड आणि पक्ष्यांचं नात तसं अतुट आहे. पक्ष्यांसाठी आपल्या हक्काचा निवारा म्हणजेच झाडं. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. ती पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही. माणसाचा निवासा जसा उद्ध्वस्त झाल्यावर त्याला वेदना होतात, तशाच त्या पक्ष्यांनाही होतात याचं उदाहरण त्या निमित्तानं समोर आलं आहे. त्या आईची नजर आपल्या पिल्लांना शोधत होती. परंतु त्या आईला आपली पिल्लंच सापडली नाहीत. केरळमधील पलक्कड रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला. अनेक वर्ष जुनं असं गुलमोहराचं झाड कापण्यात आलं. या झाडावर एक नव्हे दोन नव्हे तर शंभरापेक्षा अधिक पक्ष्यांची घरटी होती. या प्रकारामुळे या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली आहेत.
हे गुलमोहराचं झाड कापण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता या प्रकरणी रेल्वेचे अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर रोजी हे झाड कापल्याचा प्रकार घडला. झाड कापल्यामुळे पक्ष्यांची घरटी तर उद्ध्वस्त झालीच पण काही पिल्लांना या जगात येण्यापूर्वीच या जगाचा निरोप घ्यावा लागला. झाड कापल्यानंतरही अनेक पक्षी या ठिकाणीच बसून होते. त्यांची नजर काहीतरी शोधत होती.
दरम्यान, या प्रकाराची माहिती जेव्हा पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांना मिळाली तेव्हा त्यांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने यावर कारवाई करत रेल्वेचे अधिकारी आणि झाड कापण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. अनेकांनी याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. दरम्यान अशा प्रकारची झाडं कापण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. तसंच त्यावर पक्ष्यांची घरटी आहेत किंवा नाहीत तसंच अन्य बाबी पडताळूनच झाडं कापण्याची परवानगी देण्यात येते.