सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ती म्हणजे एका २८ वर्षीय इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने आत्महत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या इन्फ्लुएन्सरने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये त्याने स्वतःसाठी शोकसंदेश लिहिला होता. यावेळी त्याने स्वतःचा फोटोही शेअर केला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अजमल शरीफ असून तो केरळमधील अलुवा येथील रहिवासी होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा त्याच्या खोलीत लटकलेला आढळून आला. पोलीस म्हणाले, त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, “चांगली नोकरी मिळत नसल्याने तो थोडा नैराश्यात होता.”
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अजमलचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अजमलचे इन्स्टाग्रामवर १५ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर स्वत:साठी शोकसंदेश लिहिला होता. त्याने लिहिलं, “अजमल शरीफचे निधन झाल्याचे कळवताना अतिशय दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” यावेळी त्याने एक फोटो देखील पोस्ट केला होता, ज्याच्या कॅप्शनमध्ये, लिहिलं होतं, ‘RIP अजमल शरीफ १९९५-२०२३.’ याबाबतची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा- फेसबुकवर जुळलं प्रेम अन् पोलीस स्टेशनमध्ये झालं लग्न, जाणून घ्या ऑनलाईन प्रेमाची अनोखी कहाणी
अजमलची ही पोस्ट पाहताच नेटकरी आश्चर्यचकित झाले. शिवाय स्वत:साठी शोकसंदेश लिहून एखादी व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, असा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आत्महत्या केल्यानंतर अजमलच्या पोस्टवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून त्याचा हा निर्णय चुकीचा असल्याचंही लोक म्हणत आहेत.
या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं, “लोक त्याच्यावर टीका करत आहेत, परंतु त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्याला खूप त्रास झाला असेल आणि त्याचे मानसिक आरोग्य चांगले नसेल. शेवटी आपणही माणसं आहोत.” आणखी एकाने लिहिलं, “सोशल मीडियावर आपल्या मृत्यूची माहिती देत एखादी व्यक्ती आत्महत्या करत असेल तर त्याच्या समस्या खूप मोठ्या असू शकतात.” तर अनेकांनी कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय नसल्याचंही म्हटलं आहे.