Kerala man hit by Truck Video Viral: भूतदया दाखविणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात सदर हृदयद्रावक प्रसंग घडला असून याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री ९.४१ वाजता मन्नुथी कलाथोडू जंक्शनवरील मँगो बेकरीजवळ घडली, अशी बातमी मनोरमाने दिली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एक मांजर तिचे पिल्लू रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र एका गाडीचा पिलाला धक्का बसला. जखमी झालेल्या पिलाला वाचविण्याचे मांजरीने बरेच प्रयत्न केले, मात्र वाहनांची वाहतूक सुरूच राहिल्यामुळे तिला ते शक्य झाले नाही.
याचदरम्यान सिजू तिमूथी आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना मांजर आणि तिच्या पिलाची धडपड दिसली. पिलाला सुखरूप रस्त्याच्या बाजूला नेण्यासाठी त्यांनी दुचाकी थांबवली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. सिजू तिमूथी (वय ४४) पिलाच्या दिशेने मदतीसाठी जात असताना एका भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ते समोरून येणाऱ्या वाहनावर फेकले गेले. तसेच त्या वाहनाने त्यांना काही अंतर फरफटत नेले.
या घटनेनंतर त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्ननंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मुक्या प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरून उतरलेल्या सिजू यांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. अनेकांनी भरधाव ट्रक चालविणाऱ्या चालकाला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर अपघात झाल्यानंतर चालकाने तिथून पळ काढल्याचे दिसून येत आहे.
अशाच प्रकारची एक घटना ऑगस्ट २०२२ मध्ये घडली होती. दिल्लीतील वझिराबाद येथे रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात २४ वर्षीय तरूणाची दुचाकी रस्त्यावर घसरली. दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर पडल्यानंतर मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्याला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.