दुबईमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या एका भारतीयाला जॅकपॉट लॉटरी लागली आहे. या चालकाला ३ जून रोजी जाहीर झालेल्या लॉटरीच्या निकालामध्ये २० मिलियन द्राम्स म्हणजेच ४० कोटी रुपयांचा जॅकपॉट लागलाय.
खलीज टाइम्सने दिलेल्या वुत्तानुसार ४० कोटींचा जॅकपॉट जिंकणाऱ्या व्यक्तीचं नाव रणजीत सोमराजन असं आहे. मागील तीन वर्षांपासून या लॉटरीची तिकीटं घेत होता. अखेर तीन वर्षांनी त्याला या लॉटरीच्या सोडतीमध्ये यश मिळालं. मला कधी एवढं मोठं बक्षीस मिळेल असं वाटलं नव्हतं, असं रणजीतने वृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. “मला कायम तिसऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस लागेल अशी अपेक्षा असायची,” असं ३७ वर्षीय रणजीत सांगतो.
नक्की वाचा >> लस घेणाऱ्यांना १० कोटी रुपये जिंकण्याची संधी; ‘या’ राज्यात सरकारनेच सुरु केली लॉटरी योजना
समोर आलेल्या माहितीनुसार रणजीत आणि त्याची पत्नी संजीवनी पेरीरा या त्यांचा मुलगा निरंजनसोबत प्रवासात असतानाच लॉटरी लागल्याची माहिती मिळाली. पहिल्यांना एक मिलियन द्राम्सचं तिसरं आणि ती मिलियन द्राम्सचं दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाची घोषणा झाली तेव्हा यंदाची आपली संधी हुकल्यासारखं रणजीतला वाटलं. त्यावेळी जो एका मशीदीसमोरुनच प्रवास करत होता. “मला परत अपयश आलं असं मी मनातल्या मनात म्हटलं. मात्र मी गाडीने भाजी मार्केटमध्ये जात असतानाच मला काहीतरी वाटलं आणि मी पुन्हा क्रमांक चेक केला माझ्या तिकीटाला २० मिलियन द्राम्सचं पहिलं बक्षीस लागल्याचं लक्षात आलं. हे पाहताच माझा आठ वर्षांचा मुलगा आनंदाने उड्या मारु लागला,” असं रणजीतने सांगितलं. या लॉटरीच्या विजेत्याच्या नावाची घोषणा आयोजकांनी फेसबुकवरुनही केली आहे.
रणजीत हा मुळचा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील आहेत. २००८ पासून तो दुबईमध्ये काम करतोय. या लॉटरीमुळे आता आपलं आयुष्य सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा रणजीतला आहे. “मी २००८ पासून इथे आहे. मी दुबईमधील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टॅक्सी चालक म्हणून काम केलं आहे. मी काही ठिकाणी ड्रायव्हर कम सेल्समन असंही काम केलं. मात्र माझ्या पगारामध्ये कपात झाल्याने आयुष्य खडतर झालं होतं. आता मला एका कंपनीमध्ये ड्रायव्हर कम पीआरओ अशी नोकरी मिळालीय. मी पुढील महिन्यात तिथे कामावर रुजू होणार आहे. तिथे माझा पगार ३५०० द्राम्स (भारतीय चलनानुसार ७१ हजार रुपये) असेल. माझी पत्नी हॉटेलमध्ये काम करते. माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याच्या उद्देशाने मी तिकीटं घेत होतो. मला कायमच व्यवसाय करण्याची इच्छा होती. आता मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा करुन यासंदर्भातील निर्णय घेईल,” असं रणजीत सांगतो.