सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे ती एका १५ सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या बाजूला असणारे एक दारु विक्री करणारे दुकान उघडते आणि दुकानात जाण्यासाठी लोकांचा मोठा जमाव घोळका करुन धावत सुटताना दिसतो. या धावपळीमध्ये काही मद्यप्रेमी अगदी पडतानाही दिसतात. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनीही या व्हिडिओला अगदीच मजेदार कॅप्शन दिली आहे. ‘भूकंप किंवा भूस्खलन नाही ही तर दारु विकत घेण्यासाठी धावपळ करणारी गर्दी आहे,’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तरी हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी तो शेअर केला आहे.

फेसबुकवर जयामणी पी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ जवळजवळ आठवडाभरापूर्वी शेअर केला आहे. अठरा लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला आहे. तर ३५ हजारहून अधिक जणांनी तो शेअऱ केला आहे. व्हिडिओ नक्की कधीचा आहे हे ठामपणे सांगता येत नसले तरी हा केरळमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर आचारसंहिता संपल्यावर दारुची दुकाने पुन्हा सुरु झाली त्यावेळीचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. २१ ऑक्टोबरला केरळमध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली. २४ ऑक्टोबरला निकाल लागले. आचारसंहितेमुळे दोन दिवस या ठिकाणी दारुची दुकाने बंद होती. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांनी दारुची दुकाने सुरु झाल्यानंतर लोकांनी दुकांनाकडे घोळक्याने व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे धाव घेतली.

अनेक पेजेसने हा व्हिडिओ शेअर केला असला तरी या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल ठोस माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.  केरळमध्ये अशाप्रकारे दारुच्या दुकानांपुढे गर्दी होणे सामान्य गोष्ट आहे. सर्वात आधी दारु कोण विकत घेतो यासाठी येथे स्पर्धा सुरु असते. अर्थात एकदा रांग लावल्यानंतर सर्व गिऱ्हाईक रांगेत उभे राहूनच दारु विकत घेतात.