ह्युंदईनंतर फूड चेन केएफसीच्या पाकिस्तान फ्रेंचाइसीने काश्मीरप्रकरणी वादग्रस्त पोस्ट केली होती. काश्मीर संदर्भातील कार्यक्रमात सोशल मीडियावर जागतिक कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदई, पिझ्झा हट, केएफसीने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केल्या होत्या. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. यानंतर नेटकऱ्यांनी #BoycottKFC हॅगटॅग वापरत नाराजी व्यक्त केली होती. या ट्रेंडनंतर केएफसीला उपरती झाली असून माफी मागितली आहे. केएफसी पाकिस्तानच्या अधिकृत खात्यावरून काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या समर्थन करण्यात आलं होतं. ही पोस्ट अंगलट आल्यानंतर केएफसी इंडियाने सारवासारव केली आहे. आतापर्यंत या सर्व प्रकरणांवर भारत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
केएफसीचा माफीनामा
केएफसी इंडियाने एक ट्वीट करत माफी मागितली आहे. केएफसीने लिहिलं आहे की,”देशाबाबहेर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टप्रकरणी आम्ही माफी मागत आहोत. आम्ही भारताचा सन्मान करतो आणि भारतीयांची सेवा करण्यास आम्ही पूर्णपणे कटीबद्ध आहोत.”
नेमकं काय होतं पोस्टमध्ये?
पाकिस्तानमध्ये साजरा करण्यात आलेल्या काश्मीर एकता दिनानिमित्त केएफसीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. “काश्मीर एकता दिनानिमित्त आम्ही त्यांच्या स्वातंत्र्यांच्या अधिकारासोबत उभे आहोत” अशी पोस्ट केली होती. यानंतर नव्या वादाला फोडणी मिळाली होती.
याआधी ह्युंदईबाबत केलेल्या पोस्टबाबत सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर कंपनीला पोस्ट हटवण्यासोबतच अधिकृत पत्रही जारी करावे लागले होते. भारत अनेक कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. जर एखाद्या ब्रँडवर बहिष्कार टाकण्यात आला, तर खूप मोठे नुकसान होऊ शकते.