गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मिडीयावरून प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविषयी संताप व्यक्त होत असतानाच केरळमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने धक्कादायक घोषणा केली आहे. केरळमधील भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी या संघटनेने १० डिसेंबरपर्यंत सर्वाधिक कुत्रे मारणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बक्षिस म्हणून सोन्याची नाणी देण्याचे जाहीर केले आहे. केरळमध्ये गेल्या चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू आणि तब्बल ७०० जण जखमी झाले आहेत. त्यामुळेच सेंट थॉमस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने सर्वाधिक कुत्रे मारणाऱ्या पंचायती आणि महानगरपालिकांमधील अधिकाऱ्यांना भेटवस्तू देण्याची योजना आखली आहे. यापूर्वी या संघटनेने कुत्र्यांना मारण्यासाठी मोफत बंदुका वाटल्यामुळे मोठा वाद उसळला होता.
राज्यातील उद्योजकांनीही श्वान हटाव मोहिमेसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार असमर्थ असून त्यासाठी लोकांची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेसाठी वितरित केल्या जाणाऱ्या सूवर्ण नाण्यांचे संकलन करण्यासाठी संघटनेच्या १२०० सदस्यांकडून निधी संकलित केला जाणार आहे. या निधीच्या प्रमाणात वाटप करण्यात येणाऱ्या सोन्याच्या नाण्यांचे वजन ठरणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी वरकळ येथे राघवन या ९० वर्षीय वृद्धाचा भटक्या हल्ल्यांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. सरकारी माहितीनुसार, यंदाच्या वर्षी केरळमध्ये तब्बल ५३ हजार लोक कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. याशिवाय, २०१३ मध्ये ८८,१७२ तर २०१४ मध्ये १,१९,११९ आणि २०१५ मध्ये ४७,१५६ श्वानदंशाच्या घटना घडल्या होत्या.