देशाचे ११ वे राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान आहेत. अनेक तरुणांचे तर ते आदर्शच आहेत. उत्तम शास्त्रज्ञ, हाडाचे शिक्षक आणि यशस्वी राष्ट्रपती म्हणून त्यांची देशालाच नाही तर जगाला ओळख आहे. मात्र इतके मोठे पद भूषवितानाही त्यांच्यातील ‘कॉमन मॅन’चे दर्शन घडते. आता हे सारे आठवण्याचे कारण काय, तर माजी आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी डॉ. कलाम यांचे काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत.

‘मिसाईलमॅन’ म्हणून ओळख असलेले कलाम यांचे पाय कायमच जमिनीवर होते. आपल्या मोठेपणाचा त्यांनी कधीच बडेजाव केला नाही. विविध कार्यक्रमांमध्येही विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्या शंकांचे निरसन करताना, तसेच सामान्यांशी संवाद साधताना ते अनेकदा दिसून आले आहेत. अशाच डॉ. कलाम यांच्या साधेपणाचा दाखला देणारे काही फोटो किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये डॉ. कलाम यांच्या फाटलेल्या अवस्थेतील चप्पल आहेत. त्यांच्या शिलाँग येथील शेवटच्या प्रवासाच्या सुटकेसमध्ये या चपला होत्या. त्या म्हणतात, पाहा या चपला कशा फाटलेल्या आहेत आणि दुरुस्तही करुन घेतल्या आहेत.

किरण बेदींच्या या ट्विटला सोशल मीडियावरुन भरघोस प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अतिशय कमी कालावधीत ११०० जणांनी रिट्विट केले असून ३४०० जणांनी या पोस्टला लाईक केले आहे. ही रिट्विट आणि लाईक करणाऱ्यांची संख्या आणखीही वाढतेच आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या असून, या व्यक्तीकडून साधेपणा शिकायला हवा असे एकाने म्हटले आहे. भारत हा अतिशय भाग्यवान देश आहे ज्याला डॉ. कलामांसारखे रत्न मिळाले होते असेही एकाने म्हटले आहे. त्यामुळे किरण बेदी यांनी या महान व्यक्तिमत्त्वाविषयी प्रेरणादायी पोस्ट शेअर करुन नेटीझन्सना पुन्हा एकदा विचार करायला लावला आहे.

Story img Loader