राजकीय नेते मंडळी म्हटलं की आरोप प्रत्यारोप आणि निवडणुका डोळ्यासमोर येतात. त्यातही अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलणारे नेते असले की ते लोकांच्या अगदी परिचयाचे होऊन जातात. असाच एक चेहरा म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा. शिवसेनेची बाजू मांडताना अनेकदा पेडणेकर यांनी केलेली वक्तव्ये आणि दावे यावरुन विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याचं आणि त्यावरुन वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र याच किशोर पेडणेकरांचं अगदी वेगळं रुप नुकतच झी मराठीच्या चला हवा येऊ द्याच्या सेटवर पहायला मिळालं. राजकीय आरोप प्रत्यारोप करताना दिसणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमामध्ये दिलखुलास गप्पा मारताना आपण एकदा भावाच्या भितीने लव्ह लेटर खाल्लं होतं असंही सांगितलं.
नक्की पाहा >> Photos: “पाया पडतो, भांडू नको…”; स्वत:च्याच लग्नात शहाजीबापूंनी पत्नीला सोन्याऐवजी दिलेले पितळ्याचे दागिने; कारण…
राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या राजकारण्यांची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न चला हवा येऊ द्याच्या आजच्या म्हणजेच १८ जूलैच्या भागामध्ये पहायला मिळणार आहे. या विशेष भागाच्या जाहिरातीमध्ये शहाजीबापू पाटील यांच्यासोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्या पतीसोबत सहभागी झाल्याचं दिसत आहे. याच प्रोमोमध्ये किशोरी पेडणेकर यांनी पती किशोरी यांच्याकडून आलेलं एक लव्ह लेटर आपण खाल्लं होतं असं मजेदार खुलासा केल्याचं पहायला मिळालं. हा किस्सा ऐकून स्वप्नील जोशीलाही आश्चर्याचा धक्का बसला.
नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर
नेमकं काय घडलं होतं याबद्दल सांगताना किशोरी पेडणेकर यांनी, “आम्ही सगळे घरात होतो. सकाळच्या वेळ होती. त्याचवेळी त्यांनी मला इतक्या घाईत चिठ्ठी दिली की ती खाली पडली. माझ्या एका भावाने ती पाहिली,” असं या खाल्लेल्या लव्ह लेटरबद्दल सांगताना म्हटलं. पुढे त्यांनी भावाला शंका आल्याने आपल्याला न वाचताच ती चिठ्ठी खावी लागल्याचं सांगितलं. “भावाने पाहिलं म्हणजे तो आता मला या चिठ्ठीबद्दल विचारणार असं वाटलं. म्हणून मी ती चिठ्ठीच खाऊन टाकली,” असं त्या जुनी आठवण सांगताना म्हणाल्या.
नक्की वाचा >> “…अन् रेखा माझी जान”; ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर पत्नीच्या खांद्यावर हात ठेवत आमदार शहाजीबापूंचा भन्नाट उखाणा
हे ऐकून सर्वचजण हसू लागले. मात्र त्याचवेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करणारे डॉक्टर निलेश साबळे यांनी ही चिठ्ठी किशोरी पेडणेकर यांनी खाल्ल्याने त्यात काय लिहिलं होतं कोणाला माहिती नाही असं म्हटलं. त्यामुळेच किशोरी यांचे पती किशोर यांना कागद आणि पेन देऊन चिठ्ठी लिहून घेऊयात, असा सल्ला साबळेंनी दिला. त्याप्रमाणे किशोर यांनी पुन्हा त्या चिठ्ठीमधील मजकूर लिहिला आणि वाचून दाखवला. “प्रिय शुभांगी आज संध्याकाळी लोअर परळ स्टेशनला पाच वाजता भेट. तुझाच किशोर,” हा चिठ्ठीतील मजकूर किशोर यांनी वाचून दाखवला.