दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच या व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. जगभरातील लोकांना मानवाधिकाराकडे आकर्षित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषीत केला. जगभरातील सर्व देशांना १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्याच्या सुचना दिल्या. तेव्हापासून जगभरात १० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो.
मानवाधिकारांच्या घोषणापत्रात एकूण ३० कलमे असून त्यांचा सविस्तर अर्थ नंतर झालेल्या अनेक जागतिक करारांमधून, राष्ट्रीय घटना आणि कायदे यातून आणि स्थानिक मानवाधिकार संघटनांकडून लावण्यात आला आहे. या घोषणापत्रावर आधारित “मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक” १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. १९७६ मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्यास आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सर्वात प्रथम जगातील ४८ देशांनी हा दिवस साजरा केला.
मानवाधिकार म्हणजे काय?
मानवाधिकार म्हणजे सर्व मनुष्य प्राण्यांचे मूलभूत अधिकार आहेत, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, रहिवासी, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात. यामध्ये कुठल्याही प्रकराचा भेदभाव नसतो. वैश्विक मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, करार, सराव, सर्वसाधारण तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे अन्य स्रोत अश्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.