Kokan Bhajan Dabalbari Viral Video : “हे गजानना श्री गणराया, करु आरती मी तुजला…” हे सूर ऐकताच आठवण होते ती कोकणातील भजनांची. कोकणात विशेषत: गणेशोत्सव काळात घरोघरी भजनांचे सूर घुमू लागतात. भजन म्हणजे कोकणवासियांसाठी देवाची भक्ती. टाळ- मृदंगाच्या साथीने या भक्तीत एकरुप होत कोकणवासिय भजनाचा आनंद घेतात. कोकणकरांसाठी भजन कलेबद्दल एक वेगळी आत्मियता किंवा अप्रूप आहे, त्यामुळे कोकणात वाडीवाडीत तुम्हाला एकतरी भजन मंडळ दिसेलच. याच भजन कलेत हल्ली अनेक वेगळंपण पाहायला मिळतं, याच कलेतील वेगळंपण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

बुवांनी चक्क डोक्याने सुरात वाजवली पेटी

कोकणात भजन गाणाऱ्या व्यक्तीला बुवा असे म्हटले जाते. भजनी मंडळात बुवा पेटीच्या साथीने भजनाला सुरुवात करतात, त्यानंतर इतर लोक त्यांना टाळ-मृदंगासह सुरात साथ देतात. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल की, भजनादरम्यान पेटी ही हाताने वाजली जाते, पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक बुवा चक्क डोक्याने सुरात पेटी वाजवताना दिसत आहे. त्यांची ही कला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका मंदिरात डबलबारी भजनाचा कार्यक्रम सुरू आहे, यावेळी गावातील अनेक जण भजन डबल बारीचा आनंद घेण्यासाठी मंदिरात जमा झाले आहेत. यावेळी एक बुवा “तुच सुखकर्ता, तुच दु:खहर्ता” हे गाणं पेटीवर हाताने नाही तर चक्क डोक्याने वाजवून दाखवत आहेत, तेही अगदी सुरात… यादरम्यान भजनी मंडळातील लोक त्यांना टाळ-मृदंगाची साथ देत आहेत. त्यांची ही पेटी वाजवण्याची अनोखी कला पाहून उपस्थित लोकही भारावून गेले, काही जण त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करू लागले.

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

दरम्यान, हा व्हिडीओ @omkar_kuvlekar नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पेटी वाजवणाऱ्या बुवांचे नाव दिले आहे, “व्यंकटेश नर बुवांनी डोक्यानी वाजावल्यानी पेटी..” अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे. एका युजरने लिहिले की, पेटीचा बादशहा, दुसऱ्या युजरने म्हटले की, नादखुळा; तिसऱ्या युजरने म्हटले की, एक नंबर, व्वा बुवा…, अशाप्रकारे युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करून बुवांच्या अनोख्या पद्धतीने पेटी वाजवण्याच्या कलेला दाद देत आहेत.