Kolhapur Shocking Video : राज्यात नागरिकांना सध्या उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतायत. उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असल्याने अनेक जण थंडाव्यासाठी लस्सी, बर्फाचा गोळा, सरबत, थंड पाण्याचा आधार घेताना दिसतायत. मात्र, हे पदार्थ थंड ठेवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ नेमका कुठला असतो, तो शुद्ध असतो की नाही याचा कधी विचार केलाय का? नसेल तर आता करा. कारण कोल्हापूरमधील एका रुग्णालय परिसरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. यात एका नारळपाणी विक्रेत्याने मृतदेहासाठी वापरून गटारात फेकलेला बर्फ चक्क पाणी, सरबत, लस्सी थंड करण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरदेखील तुफान व्हायरल होतोय.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे म्हणजे सीपीआर रुग्णालय परिसरात मृतदेहासाठी वापरून नंतर गटरात टाकून दिलेला बर्फ पाण्याच्या बाटल्या थंड करण्यासाठी वापरला जात होता. ही घटना काही जागृत नागरिकांच्या लक्षात आली, यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बर्फाच्या बॉक्सभोवती मुंग्या अन् माश्या
शुक्रवारी एका रुग्णवाहिकेने मृतदेह सोडून आल्यानंतर त्यासाठी वापरलेला बर्फ सीपीआर रुग्णालयाबाहेरील गटारात टाकून दिला, हाच बर्फ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नारळ पाणी विक्रेत्याने बादलीत भरून नेला आणि तो धुवून पाण्याच्या बाटल्या, लस्सी, सरबताच्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये तुकडे करून भरला. ही बाब उपस्थित नागरिकांनी पाहिली आणि त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवला. यावेळी काही नागरिकांनी नारळ पाणी विक्रेत्याला या संदर्भात जाब विचारला. तसेच बर्फ टाकलेले थर्माकोलचे बॉक्सदेखील उघडण्यास सांगितले. त्यावेळी त्या बॉक्समध्ये बर्फ आणि त्यावर पाण्याच्या बाटल्या थंड करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे त्या बर्फाच्या बॉक्सभोवती मोठ्या प्रमाणात मुंग्या आणि माश्यादेखील फिरत होत्या.
विक्रेत्याला सतर्क नागरिकांनी दिला चांगलाच चोप
अतिशय घाणेरड्या जागेत हे ठेवण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांनी जाब विचारला, पण आपण असं काहीच केलं नसल्याचे उत्तर विक्रेत्याने दिले; यावर संतापलेल्या नागरिकांनी विक्रेत्याला चांगलाच चोप दिला. पण, या घटनेतून विक्रेते कशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळतात हे अधोरेखित होतेय, त्यामुळे तुम्हीही रुग्णालयाबाहेर काही खाताना किंवा विकत घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे.