सोशल मीडियावर विचित्र वा भयंकर पदार्थांचे असंख्य व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. फॅन्टा मॅगी, ओरिओ वडे, फळांचा चहा, चीज घातलेले संत्र्याचे सरबत… ही यादी कधीही न संपणारी आहे. पण सगळेच पदार्थ असे विचित्र असतात, असे नाही. दोन भलत्याच पदार्थांना एकत्र केल्यानंतर ते नेहमीच वाईट लागतील, असे नसते. अशातच या एका नवीन ‘फूड कॉम्बिनेशन’ची भर या यादीमध्ये पडली आहे. आता हा पदार्थ सर्वांच्या लाडक्या गुलाबजामपासून बनवला गेला आहे. परंतु, गुलाबजामपासून बनवलेला हा पदार्थ भारतात नाही, तर चक्क भारताबाहेरील एक रेस्टॉरंटमध्ये बनवला गेला आहे. गुलाबजाम आणि कॉफी, असे दोन वेगळे पदार्थ एकत्र करून नक्की कुठे विकले जात आहे ते पाहा.
न्यूयॉर्कमधील कोलकात चायको [kolkatachaico] या रेस्टॉरंटने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून, ‘गुलाबजाम लाटे [latte]’ या नवीन पेयाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे पेय गरम आणि गार अशा दोन्ही स्वरूपांत मिळू शकते. ” ‘द गुलाबजामुन लाटे’ या नवीन पेयाचे स्वागत करू या. खवा आणि केशर घालून बनवल्या जाणाऱ्या गुलाबजाम या मिठाईला आम्ही लाटेच्या स्वरूपात घेऊन आलो आहोत. गरम किंवा गार अशा दोन्ही प्रकारे तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. हिवाळी पदार्थांमध्ये हे पेय कायम उपलब्ध असेल,” अशी कॅप्शन त्याखाली पाहायला मिळते.
हेही वाचा : अरे बापरे! आपल्याच वडिलांना ओळखणे झाले मुश्कील…; जुळ्या मुलींच्या निरागस प्रतिक्रियेचा व्हिडीओ पाहा
‘गुलाबजामुन लाटे’च्या या पोस्टवर दोन लाख इतके व्ह्युज आले असून, त्यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.
खरे तर गुलाबजाम आणि कॉफीच्या या कॉम्बिनेशनवर लोकांनी वर वाईट प्रतिक्रिया दिल्या असतील, असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे मुळीच नाही. याउलट नेटकऱ्यांनी या जोडीचे फार कौतुक केलेले आपल्याला पाहायला मिळेल.
एकाने, “हा पदार्थ व्हेगन म्हणूनही मिळेल का?” असे विचारले आहे. तर, दुसऱ्याने, “वाह.. दिसायलाच फार सुंदर दिसतो आहे,” असे लिहिले. तिसऱ्याने, “या लाटेमध्ये, बोबा टी [boba tea- चहाचा एक प्रकार] प्रमाणे गुलाबजाम असतील का,” असा प्रश्न केला आहे. “सांस्कृतिक क्रांती यालाच म्हणतात,” असे काहीसे चौथ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.