Kolkata Doctor Rape Murder Case : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर, विशेषत: एक्सवर कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येसंबंधीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचा आढळून आला. या व्हिडीओच्या माध्यमातून दावा करण्यात आला आहे की, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडितेच्या मृतदेहाची वाहतूक करणाऱ्या कारला आरजी कार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी थांबवले तेव्हाचे हे फुटेज आहेत. दाव्यात पुढे असेही म्हटले आहे की, जर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी हस्तक्षेप केला नसता, तर ही घटना आजपर्यंत समोर आली नसती.
काही वापरकर्त्यांनी असाही दावा केला आहे की, व्हिडीओमधील डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या महिला कार्यकर्त्या मीनाक्षी मुखर्जी यांंनी कोलकाता पोलिसांना पीडितेच्या मृतदेहाची वाहतूक करण्यापासून रोखले. दरम्यान, या घटनेनंतर आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त लोकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पण, खरंच व्हायरल व्हिडीओतील दाव्यानुसार, कोलकाता बलात्कार -हत्येची घटना डॉक्टरांच्या हस्तक्षेपामुळे उघड झाली आहे का? डॉक्टरांनी पीडितेचा मृतदेह घेऊन जाणारी गाडी रोखली का? या सर्व प्रश्नांची आणि घटनेची सत्य बाजू जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल? (Kolkata Doctor Rape and Murder Case Update)
X युजर Surajit ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला.
इतर वापरकर्तेदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि नंतर व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज चालवून तपास सुरू केला.
आम्हाला यावेळी CPI (M) ने एक्सवर १० ऑगस्ट २०२४ रोजी केलेली एक पोस्ट सापडली.
कॅप्शनमध्ये नमूद केले आहे : डाव्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आंदोलन केले, संस्थेतील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्याच्या बलात्कार आणि हत्येसाठी न्याय मागितला.
आम्हाला एक YouTube शॉर्टदेखील सापडला, ज्यात असे म्हटले होते की: RG ???Kar #আরজি_কর ব্যবসা চত্বরে CPIM এর প্রতিবাদ. WB, India..??? (CPI M protest at RG Kar Hospital premises. WB, India.)
आम्ही कोलकाता येथील इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकारांशीदेखील संपर्क साधला, ज्यांनी पुष्टी केली की, व्हिडीओमध्ये डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या मीनाक्षी मुखर्जी आहेत, परंतु त्या घटनेचा निषेध करत असतानाचा व्हिडीओ वेगळ्या दिवसाचा आहे. हा व्हिडीओ ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना समोर आली त्या दिवसाचा नाही.
आम्ही एनडीटीव्ही कोलकाता ब्यूरो चीफ सौरभ गुप्ता यांच्याशी बोललो, ज्यांनी माहिती दिली की, पोस्टमध्ये दावा केल्यानुसार सीपीआय (एम) कार्यकर्ते उपस्थित नव्हते; जेव्हा या घटनेची मीडियाने प्रथम माहिती दिली होती.
निष्कर्ष : कोलकाता येथील आर जी कार रुग्णालयातील सीपीआय (एम) कार्यकर्त्यांच्या निषेधाचा व्हिडीओ डॉक्टरांनी कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडितेच्या मृतदेहाची वाहतूक करणारी कार थांबवल्याचा सांगून व्हायरल केला जात आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतून केला जाणारा दावादेखील दिशाभूल करणारा आहे.