Female professor weds student Video Viral: पश्चिम बंगालमधील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिकेने विद्यार्थ्याशी भरवर्गात लग्नगाठ बांधली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सदर लग्न हे मानसशास्त्राशी जोडलेल्या एका प्रयोगाचे होते, असा दावा प्राध्यापिकेकडून करण्यात आला. मात्र त्यावर विश्वास बसण्यासारखी परिस्थिती नव्हती. सदर घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्राध्यापिकेने वधूप्रमाणे पेहराव केल्याचे दिसत आहे. तसेच लग्नाच्या विधीही वर्गात पार पडल्या होत्या. यानंतर विद्यापीठाने सदर प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली होती. आता या प्राध्यापिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या आठवड्यात जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण समोर आले, तेव्हा सदर प्राध्यापिकेवर जोरदार टीका करण्यात आली. लग्न करण्यात आलेला मुलगा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील वर्गात अशाप्रकारे लग्न लावणे कितपत योग्य आहे? असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला. २८ जानेवारी रोजी हे लग्न पार पडल्याचे सांगितले जाते.

दरम्यान पीटीआयने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, सदर प्राध्यापिकेने आता राजीनामा सादर केला आहे. विद्यापीठाबरोबर यापुढे काम करता येणार नसल्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहे, असे पत्र प्राध्यापिकेने पाठविले आहे. व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्यानंतर आपल्याला जबर मानसिक धक्का बसल्याचे प्राध्यापिकेने म्हटले होते. त्यापूर्वी महाविद्यालयाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. महाविद्यालयाने काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करते, असे प्राध्यापिकेने दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे.

लग्न खोटं असल्याचं महाविद्यालयाला माहीत होतं?

दरम्यान व्हायरल व्हिडीओबद्दल महाविद्यालयाला आधीच कल्पना होती, असा दावा केला जात आहे. हा प्रकार मानसशास्त्रीय नाट्याचा एक भाग होता. मात्र व्हायरल व्हिडीवर वाद निर्माण झाल्यामुळे सदर प्राध्यापिकेला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.