कोटा हे राजस्थानचे शैक्षणिक केंद्र आहे. येथे देशभरातून हजारो मुलं कोचिंगसाठी येतात. यातील बहुतांश मुले बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असतात. शिवाय कोटामध्ये क्लाससाठी आलेला प्रत्येक मुलगा इंजिनीअर आणि डॉक्टर झालाच पाहिजे किंवा प्रत्येकाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे असा काही नियम नाही. कारण कोटामध्ये येणारी काही मुलं तणाव आणि नैराश्यात सापडतात. शिवाय त्यांच्या खांद्यावर पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षांचे इतके ओझे असते की ते घरी परतण्याऐवजी किंवा कोणाजवळ आपलं मन हलके करण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडतात.
कोटा येथील आत्महत्येची बातमी एवढी सामान्य झाली आहे की, आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने एक नवीन उपाय शोधला आहे. त्यानुसार आता कोटामधील सर्व वसतिगृहे आणि पेइंग गेस्ट (PG) निवासस्थानांमध्ये स्प्रिंग लोडेड पंखे लावले जाणार आहेत. या स्प्रिंग फॅनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या नवीन फॅनमुळे आत्महत्यांच्या घटनांना खरोखरच आळा बसेल का, असा प्रश्न लोक प्रशासनाला विचारत आहे. तसेच प्रशासनाच्या या निर्णयाशी लोक किती सहमत आहेत हे तुम्हाला खालील ट्विटवरून लक्षात येईल. कारण बहुतांश नेटकऱ्यांनी प्रशासनाचा हा निर्णय फारसा पटला नसल्याचं दिसत आहे.
हेही पाहा- पालक मिटींगला जाण्यापूर्वी मुलाने घेतली वडिलांची शाळा, व्हायरल VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवरून कोटामध्ये स्प्रिंगचे फॅन बसविल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, “राजस्थान: कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना कमी करण्यासाठी कोटामधील सर्व वसतिगृहांमध्ये आणि पेइंग गेस्ट (PG) निवासस्थानांमध्ये स्प्रिंग लोडेड पंखे बसविण्यात आले आहेत.” असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर प्रशासनाच्या या निर्णयावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी याला स्तुत्य उपक्रम म्हटलं तर अनेकांनी या फॅनमुळे काय होणार, शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.
एका वापरकर्त्याने मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
तर आणखी एकाने हे फॅनबद्दल नाही, तर ते मानसिक आरोग्याबद्दल आहे असं म्हटलं आहे.
तर काहींनी प्रशासनाच्या निर्णयावर मजेशीर मीम्स बनवली आहेत. पंखे बसवल्यानंतर कोटा येथील संस्था…, असं कॅप्शन लिहित एका नेटकऱ्याने मजेशीर फोटो ट्विट केला आहे.