Andheri Best Bus Driver Buys Alcohol Video Viral: मुंबईत गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र कुर्ला पश्चिममध्ये झालेल्या अपघाताची मोठी चर्चा सुरु आहे. ज्यात घटनेत बेस्ट बसला भीषण अपघात होऊन भरधाव बेस्ट थेट मार्केटमध्ये घुसली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची चौकशी सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मनसेने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये बेस्ट बस चालक ड्युटीवर असताना दारू खरेदी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना अंधेरी वेस्टच्या वर्सोवा भागात घडली असून याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेताना मनसेकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी बेस्ट बस चालकाचा वाईन शॉपवरुन दारू घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. बेस्टचा बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. तिथून दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसला. महत्त्वाचं म्हणजे त्या बसमध्ये प्रवासी बसल्याचं दिसतंय. बेस्ट बस चालकांवर बेस्ट प्रशासनाचं नियंत्रण आहे का? असा प्रश्न मनसेकडून करण्यात आला आहे. त्यासोबत वाईन शॉपवर बेस्ट बस थांबवून दारू घेणाऱ्या बस चालकाचा विरोधात काय कारवाई करणार असा सवालही मनसेने केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, बेस्ट चालक बसमधून उतरतो आणि अंधेरी पश्चिम येथे असलेल्या एका दारूच्या दुकानात जातो. परत येताना त्याच्या हातात एक दारूची बॉटल दिसत असून तो तसच बसमध्ये बस चालवण्यासाठी बसतो. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर त्या बस संपूर्ण प्रवाशांनी भरलेली आहे. बस चालकाना फक्त आणि फक्त बस वाईन शॉपजवळ दारू खरेदी करण्यासाठी उभी केली होती असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर सोमवारी रात्री बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. या अपघातात सात जण ठार, तर ४९ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला – अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक रस्त्यावर सैरावैरा पळू लागले. घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसचालक व वाहकाला ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले. दोघांनाही कुर्ला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी चालक मोरेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, ११८(१), ११८(२), ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोरेला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.