L&T Chairman SN Subrahmanyan On Work Hours : गेल्या काही काळात कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करायचे याबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमांतून बरीच चर्चा झाली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही यावर अनेकवेळा भाष्य केले होते. अशात आता लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची राळ उठत आहे. यावेळी त्यांनी, “पत्नीकडे किती वेळ पाहत बसणार त्यापेक्षा काम करा”, असे म्हटल्याने सोशल मीडियावर याची बरीच चर्चा होते आहे.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे. यावर त्यांनी दिलेले उत्तर सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
रविवारी काम लावत नाही याचा पश्चाताप
या प्रश्नाला उत्तर देताना लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम म्हणाले, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो,” असे रेडिटवर सध्या व्हायरल होत असेल्या व्हिडिओमध्ये सुब्रमण्यम म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
किती वेळ पत्नीकडे पाहत बसणार
याच व्हिडिओमध्ये एसएन सुब्रह्मण्यम असे म्हणताना ऐकू येत आहे की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”
अमेरिकेला केव्हाही मागे टाकू शकतो
“माझी चीनमध्ये नुकतीच एक मिटींग झाली. त्यावेळी एक व्यक्ती म्हाणाला, आम्ही अमेरिकेला केव्हाही मागे टाकू शकतो. मी त्याला यामागचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, अमेरिकन लोक आठवड्याला ५० तास काम करतात, तर आम्ही आठवड्याला ९० तास काम करतो. जर तुम्हाला जगात अव्वल स्थानी विराजमान व्हायचे असेल तर वेगाने काम करावे लागेल”, असेही एसएन सुब्रह्मण्यम म्हणाले आहेत.