Ladki Sunbai Yojana : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ आणि ‘लाडका भाऊ’ या दोन योजना आणल्या. नावांमुळे या योजना चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. महिलांनी तर योजनेचा अर्ज भरण्यासाठी पहिल्या दिवसांपासून गर्दी केली. तर लाडका भाऊ योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनांतर विरोधक आणि मनोज जरांगे पाटील यांनी गंमतीमध्ये लाडका पती, लाडकी मेहुणी अशा योजना आणण्याची गंमतीशीर टीका केली होती. बारामतीमध्ये मात्र ‘लाडकी सुनबाई’ ही योजना एका हॉटेल चालकाने लागू केली. या योजनेलाही सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. नेमकी योजना काय आहे? ते पाहू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीमधील एमआयडीसी जवळ भिगवण मार्गावर असलेल्या राजवाडा पार्क नावाच्या हॉटेलने ही योजना आणली आहे. लाडकी सुनबाई योजनेअंतर्गत या हॉटेलमध्ये सासुबाईंच्या जेवणावर सुनबाईंना मोफत जेवण मिळणार आहे. या योजनेची जाहिरात सध्या बारामतीमध्ये फ्लेक्स लावून करण्यात येत आहे. हे फ्लेक्स सध्या व्हायरल झाले असून अनेकांना ही कल्पना आवडली आहे. जाहिरात अनोख्या पद्धतीने केल्यामुळे या हॉटेलची सध्या जोरदार चर्चा आहे.

लोकसत्ता ऑनलाईनने हॉटेलचे मालक आनंद संजय सावंत यांच्याशी संपर्क साधून या अनोख्या कल्पनेबद्दल जाणून घेतलं. यावेळी सावंत म्हणाले की, हॉटेलमध्ये कुटुंबांनी एकत्र येऊन जेवणाचा आनंद घ्यावा, यासाठी नेहमीच काही ना काही ऑफर काढत असतो. यावेळी जरा हटके कल्पना करावी म्हणून लाडकी बहीण योजनेवरून लाडकी सुनबाई योजना सुरू केली. जेव्हा योजनेची जाहिरात सुरू केली. तेव्हा लोकांचा आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हे वाचा >> Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कुठे कराल अर्ज? पात्र कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

कौटुंबिक जिव्हाळा वाढविण्याचा प्रयत्न

आनंद सावंत पुढे म्हणाले, “या योजनेची कल्पना महाराष्ट्रभर व्हायरल होईल, असे वाटले नव्हते. दोन दिवसांपासून माझा फोन सतत खणखणत आहे. लोक या कल्पनेबद्दल कौतुक करत आहेत. सासू-सुनेला एकत्र आणण्यासाठी ही उत्तम कल्पना आहे, असेही काही लोक सांगत आहेत. कुटुंब एकत्र राहावं, यासाठी चांगला प्रयत्न आहे. काही लोकांचे भावनिक होऊन कुटुंबाबद्दल सांगणारेही फोन येत आहेत.”

या ऑफरच्या माध्यमातून कुटुंबात जिव्हाळ्याची भावना निर्माण होत आहे. कुटुंबात आपुलकी निर्माण होत आहे. तसेच आमचा व्यवसायही होत आहे, अजून काय हवं? असेही हॉटेल मालक आनंद सावंत म्हणाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील पाच लोकांनी एकत्र जेवायला येणे गरजेचे आहे. तसेच सासूबाई जी थाळी घेणार तिच थाळी सुनबाईंना फ्री मिळणार आहे, अशीही माहिती सावंत यांनी दिली.

हे ही वाचा >> Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कुठे करावा? पात्रता अन् निकष काय? कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर!

सरकारची लाडकी बहीण योजना काय आहे?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना योजनेचा लाभ मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

लाडका भाऊ योजना काय आहे?

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki sunbai yojna brought by rajwada park hotel in baramati lets see offer kvg