मायानगरी मुंबईत येऊन मोठं नाव कमावावं, असं अनेकांना वाटतं. अशीच एक मुलगी होती जी मुंबईत आली आणि तिने बॉलीवूड चित्रपट आणि काही म्युझिक अल्बममध्ये काम केले. पण पटकन मोठे होण्याच्या आणि नाव कमवण्याच्या इच्छेने तिला गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलले. या मुलीचे नाव होते अर्चना बालमुकुंद शर्मा, जिला लेडी डॉन किंवा किडनॅपिंग क्वीन म्हटले जायचे. मात्र, आता ती जिवंत आहे की नाही, याचीदेखील कुणालाच माहिती नाही. कारण अनेकदा तिच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत.
अर्चना बालमुकुंद शर्माच्या इतिहासाचं कोडं अद्याप सुटलेलं नाही. माफिया आणि अंडरवर्ल्डवर लिहिलेल्या पुस्तकांमध्येही तिच्या परिचयाबाबत दोन मतप्रवाह आहेत. अर्चनाचे वडील बालमुकुंद शर्मा हे उज्जैनमध्ये पोलीस होते. ९० च्या दशकात ती मुंबईत आली आणि काही म्युझिक अल्बम आणि प्रसिद्ध अभिनेता देवानंद यांच्या गँगस्टर चित्रपटातही तिने काम केले. त्याचवेळी ती गायनाच्या दुनियेत हात आजमावत होती. पण त्या दरम्यान ती फजल उर रहमान, इरफान गोगा आणि अपहरणाच्या दुनियेचा बेताज बादशाह बबलू श्रीवास्तव यांच्या संपर्कात आली.
१९९० नंतर अर्चनाचे जग बदलले आणि ती नेपाळमार्गे दुबईला गेली. काही वर्षे तिथे राहिली पण १९९५ मध्ये बबलूला सिंगापूरमध्ये अटक झाल्यानंतर ती भारतात परतली. येथे आल्यानंतर तिने गोगा, फजलला सोबत घेऊन एक गँग बनवली. आतापर्यंत तिच्या नावावर खंडणी, अपहरण, खून असे अनेक गुन्हे दाखल आहेत. १९९७ मध्ये तिला दिल्लीत एका खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, काही दिवसांनी तिला जामीन मिळाला आणि ती पुन्हा गायब झाली.
१९९८ मध्ये डिसेंबर महिन्यात अर्चना कोलकाता येथील व्यापारी राजू पुनवई याच्या हत्येचा कट रचत होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. हा खून करण्यात असमर्थ ठरल्याने अर्चना फरार झाली होती. त्याच वर्षी, २२ मे १९९८ रोजी पुण्यातील पेट्रोल पंप चालकाचा मुलगा सागर लडकत याच्या अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणात अर्चनाचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात अर्चना, बबलूसह १४ जणांना आरोपी करण्यात आले होते.
१९९८ साली सागर लडकतच्या अपहरण आणि निर्घृण हत्येच्या तपासात अर्चना शर्मा या प्रकरणाची मास्टर माईंड असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्यानंतर ती भारतातून पळून गेली आणि परत कधीच आली नाही. २०१० मध्ये, नेपाळमध्ये तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी आली, परंतु आजपर्यंत त्यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही. अर्चना बालमुकुंद शर्माच्या नावावर आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.