निसर्ग हा अदभूततेने आणि विविधतेने नटलेला आहे. शहरी जीवनातील धकाधकीतून फावला वेळ काढून निसर्गाचा आनंद घेत भ्रमंती करणारे अनेकजण आढळून येतात. अशा निसर्गवेड्यांना निसर्ग सतत खुणावत असतो. मग कधी एखाद्या गड-किल्ल्याला भेट दे, तर कधी दऱ्या-खोऱ्यातून निसर्गातील विविधता न्याहाळत हुंदडणे असे उद्योग ही मंडळी करत असतात. यातील काहीजण निसर्गातील हे वैविध्य आणि अदभुतता आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा छंद जोपासताना दिसतात. मग त्यासाठी ते देहभान विसरून नैसर्गिक वातावरणात तासनतास घालवतात. निसर्गातील तो एक क्षण टिपण्यासाठी त्यांनी कमालीची मेहनत घेतलेली असते. आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देणारी अशाचप्रकारची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ इंटरनेटवर आपल्याला सहजगत्या चाळता येतात. निसर्ग फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी वाहिलेली संकेतस्थळं, युट्यूब चॅनल्स, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या अनेक सोशल मीडिया माध्यमातून आपल्याला याचा आनंद घेता येऊ शकतो. नुकताच असाच एक व्हिडिओ युट्यूबर पाहण्यात आला. एरवी दुर्लक्षिले जाणारे आणि साध्या डोळ्यांनादेखील न दिसणारे, पण कॅमेऱ्याच्या वापर करून अतिशय सुंदररित्या सादर करण्यात आलेले हे दृश्य अचंबित करणारे असे आहे. एक छोटासा किडा पण तो हवेत कशाप्रकारे झेपावतो हे दर्शविणारे दृश्य स्लो-मोशन तंत्रज्ञानाचा वापर करून कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहे. सुरुवातीला पायांची हालचाल करत, नंतर आपल्या पंखांना विस्तारत हवेत उडण्यासाठी सज्ज होत त्याने हवेत घेतलेली झेप पाहणे नक्कीच डोळ्यांना सुखावणारे आहे. स्लो-मोशनमधील हा व्हिडिओ रेनर बेरगोमझ यांनी १२९६x७२० पिक्सल रेझोल्युशनमध्ये ३००० फ्रेम्स प्रति सेकंदाने शूट केला आहे.

व्हिडिओ :

Story img Loader