भोपाळ रेल्वे स्टेशनवर एक ३० वर्षीय महिला प्रवाशांच्या गर्दीतून नेहमी मार्ग काढताना दिसते. या महिलेने अंगात लाल रंगाचा रेल्वे हमालाचा गणवेश परिधान केलेला असतो. कुली नंबर १३ असणारी ही महिला हमाल आपल्या पतीच्या निधनानंतर त्याचा गणवेश आणि क्रमांकासह हे काम करीत आहे.

रेल्वे गाड्यांमधून प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या प्रवाशांना त्यांच्या बॅगा उचलण्यास मदत करण्यासाठी लक्ष्मी सदैव तयार असते. ती एका ८ वर्षांच्या मुलाची आई आहे. तिच्या पतीचे याच वर्षी जुलै महिन्यांत निधन झाले. त्यानंतर जगण्याच्या संघर्षाशी दोन हात करताना आपल्या मुलाला चांगले जीवन जगता यावे यासाठी तिने आपल्या पतीचाच हमालीचा व्यवसाय स्विकारला.

लक्ष्मी सांगते, “आपल्याला जगण्यासाठी या कामाशिवाय दुसरा पर्याय नव्हता, माझ्या मुलासाठी मला काम करणे भाग होते. त्यामुळे हे काम स्विकारले. या कामातून मला दररोज ५० ते १०० रुपयांची मिळकत होते. शारिरिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी या कामाला मागणी आहे, मात्र, माझे शिक्षण झालेले नसल्याने हे काम करण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता. लक्ष्मीच्या पतीआधी तिचे सासू-सासऱ्यांचेही निधन झाल्याने ती आपल्या मुलासह स्वतःच्या आई-वडिलांच्या घरी राहते.

या कामामध्ये चांगले पैसे मिळत नाहीत तसेच अनेकदा तर तुमची काहीच कमाई होत नाही. मात्र, सहकारी हमाल प्रवाशांचे जड सामान उचलण्यास आपल्याला या कामात मदत करतात, असेही तिने या कामातील आव्हानांवर बोलताना सांगितले.

भोपाळ रेल्वेस्टेशनवरील या महिला हमालाला पाहूण बऱ्याचदा प्रवाशांना आश्चर्य वाटते. कारण, पुरुषी काम असल्याचा शिक्का या कामावर पडला असल्याने तसेच हा रुढीवाद सोडून ती काम करीत असल्याने अनेकांना तीचे कौतुकही वाटते.

Story img Loader