तुम्ही आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केलय? अजून नाही? तर मग आज नक्की कराच. कारण आज यासाठीचा शेवटचा दिवस आहे. आज ही प्रक्रिया केली नाहीत तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. तसेच कर भरण्याच्या प्रक्रियेतही अडचणी निर्माण होऊ शकतात. ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आली होती. यापुढे ही मुदत वाढवली जाण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे हे काम तुमच्याकडून राहीले असेल तर ते त्वरीत करुन घ्या. आता आधार कार्ड केवळ गॅसची सबसिडी मिळविण्यासाठी, बँकेचे खाते उघडण्यासाठी आणि मोबाईल फोनचे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी उपयोगी ठरते. आता ते आयकर भरण्यासाठीही सक्तीचे करण्यात येत आहे.
आयकर विवरणपत्र भरले असेल आणि त्याची प्रक्रिया झाली नसेल तर किती दंड भरावा लागेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर हे समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांची विवरणपत्र प्रक्रिया झाली नाही ते नॉन फायलरमध्ये जातील. आयकर विभागाकडून या लोकांना दंडाबरोबरच नोटीसही पाठविण्यात येणार आहे. मात्र दंडाची रक्कम अद्याप सांगण्यात आलेली नाही. बँकेशी निगडीत असणारे व्यवहार करणे अवघड होणार आहे. तुम्हाला डिमॅट अकाऊंट सुरु करायचे असेल तसेच म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदी करायचे असतील, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे.
… अशा पद्धतीने तुमच्या पॅन कार्डला आधार क्रमांक जोडा
समाज कल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड उपलब्ध करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात याविषायाची सुनावणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. याशिवाय पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द होण्यामुळे तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही. कारण करमर्यादेच्यावर असणाऱ्यांच्या पगारातूनच टीडीएस कापला जातो. तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास त्यांना हे करता येणार नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन आणि आधार क्रमांक दोन्हीही असतील तर त्याला लिंक करुन घेणे फायद्याचे ठरेल.