leopard attacked viral video: पिसाळलेल्या बिबट्याने आसामच्या जोऱ्हाट जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने इमारतीच्या कुंपणावरून मोठी झेप घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारवर हल्ला केला. बिबट्यानं माजवलेल्या दहशतीमुळं येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जवळपास १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वन विभागाचे तीन अधिकारीही जखमी झाले आहेत. जोऱ्हाट जिल्ह्यातील छेनीजन येथील रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
या परिसरात बिबट्याची दहशत
जोऱ्हाट जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मोहन लाल मीना यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ” जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ” तसंच वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, “बिबट्याने या परिसरात काही नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती आम्हाला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मिळाली. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी बिबट्याने आमच्या दोन कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. त्यानंतर आमचं दुसरं पथकही घटनास्थळी दाखल झालं. आम्ही परिस्थिती हाताळण्याचा आणि बिबट्याला जेरबंजद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”
इथे पाहा व्हिडीओ
जंगलात शिकारीसाठी भटकणारा बिबट्या मानवी वस्तीतही मुक्त संचार करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. लहान मुलांपासून छोट्या मोठ्या प्राण्यांवरही बिबट्याने हल्ला केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. बिबट्याला वेळीच जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असताता. पण अशा परिस्थितीत जंगलाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी बिबट्याच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून केले जाते. त्यामुळे बिबट्या दिसल्यास परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून तातडीनं वन विभाग किंवा पोलीसांना बिबट्याचा वावर होत असल्याची माहिती द्यावी, अशा सूचनाही वन विभागाकडून दिल्या जातात.