पुणे आणि पुणेकरांची चर्चा जगभरात होत असते. मोजक्या शब्दात माफक उत्तर देण्याच्या पुणेरी शैलीमुळे पुणेकरांच्या नादी कोणी लागत नाही. पुणेरी शैलीतील पुणेरी पाट्यांची चर्चा तर सोशल मीडियावर रोज होत असते. पुणेरी पाट्यामधील विनोदी शैली नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. पुणेकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पुण्यासदर्भातील अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पुण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे.
पुणे तिथे काय उणे ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल पण त्याचा अर्थ कधी समजून घेतला आहे का? याचा अर्थ असा आहे की,”पुण्यात अशी एकही गोष्ट नाही जी शोधून सापडणार नाही” याच म्हणीची प्रचिती देणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांना खळखळून हसायला भाग पाडत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिले आहे?
व्हायरल पोस्टमध्ये मजेशीर कोड्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध परिसरांची ओळख सांगितली आहे. खऱ्या पुणेकरांना कोडे सांगताच पटापट परिसराची नावे सांगता येतील.
पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे की, पुण्याकडे मिश्किलपणे पाहू…! आणि एक छोटेसे स्मितहास्य करू”
१) एक बाग आहे पण फुले नाहीत – तुळशीबाग
२) न वाहत्या पाण्याचा थांबा – नळस्टॉप
३) सांगायला दगड पण आहे गाव – पाषाण
४) थकल्या भागल्यांची वाडी – विश्रांतवाडी
५) मदतीचा हात पुढे करणारे – सहकार नगर
६) ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको – येरवडा
७) आडवी तिडवी वस्ती – वाकडे वाडी
८) लहान पाखरू अन् ढेरी मोठी – चिमण्या गणपती
९) फॉरेनची गल्ली -हाँगकाँग गल्ली
१०) थोर नेत्यांची पदवीवर वसाहत – लोकमान्य नगर
११) कवडी कवडीने मिळवलेली संपत्ती – धनकवडी
१२) मिठाईवाला हनुमान – जिलब्या मारुती
१३) बेवडा ब्रीज – दारुवाला पूल
१४) पिडाकारी दैवताचे ओटे – शनीपार
१५) नकार देणारी पेठ – नाना पेठ
१६) नमुनेदार वसाहत – मॉडेल कॉलनी
१७) गिळंकृत करणारे मास्तर – हडपसर
१८) सुगंधित नगर – चंदन नगर
१९) सगळे येथे ऐटीत वावरतात -हिंजवडी
२०) या बागेत सुवर्ण अंलकार नाहीत – हिराबाग
२१) हार आहे पण दगडाचा – खडकमाळ
पोस्टच्या शेवटी लिहिले आहे की, जो चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि चुकतच नाही तो पुण्याचा माणूस!!”