दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सकाळी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, पावसाची तीव्रता वाढल्यामुळे प्रशासनाकडून मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय ? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो ? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्स बद्दल.

ग्रीन अलर्ट –
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.

यलो अलर्ट –
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट –
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

दरम्यान, पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं  दिला आहे. हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.