Liam Payne Fact Check : ‘वन डायरेक्शन’ बँडचा माजी सदस्य आणि गायक लियाम पेनचा बुधवारी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्समधील हॉटेलच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून तो पडला आणि त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात गायकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर जगभरातील अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. याचदरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात गायकाला कोणीतरी इमारतीतून ढकलून देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.. पण, खरंच हा व्हिडीओ लियाम पेनचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडला त्या क्षणाचा आहे का जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर ओबेलने व्हायरल व्हिडीओ शेअर करून दिशाभूल करणारा दावा केला आहे.
इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास :
व्हायरल व्हिडीओमधून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
आम्हाला बातम्या सापडल्या, ज्यात व्हिडीओचे स्क्रीनशॉट आहेत.
अहवालात नमूद केले आहे की : सीडीएमएक्स अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, आज १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०५ वाजता कुआहतेमोक नगरपालिकेतील रिपब्लिका डी क्युबा स्ट्रीटवर आग लागल्याची माहिती मिळाली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका अपार्टमेंटच्या खोलीत ही आग लागली.
आम्हाला २०२३ मधील एक बातमी सापडली, ज्यात म्हटले आहे की मेक्सिको सिटीमध्ये आगीपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात एक माणसाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
मध्यवर्ती स्थानकातील अग्निशमन दलाने आग आजूबाजूला पसरण्याच्या आत त्यावर नियंत्रण आणले. बचाव आणि वैद्यकीय आपत्कालीन पथकाच्या (ERUM) सदस्यांनी जखमी व्यक्तीवर उपचार केले आणि त्याला तातडीने उपचांरासाठी बालबुएना सामान्य रुग्णालयात दाखल केले.
आम्हाला एक्सवर २०२३ ची पोस्टदेखील सापडली.
इतर अनेक बातम्यांच्या अहवालातही हा स्क्रीनशॉट देण्यात आला आहे.
निष्कर्ष :
मेक्सिको सिटीमध्ये २०२३ मध्ये एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने उडी मारली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. पण, तोच व्हिडीओ आता वन डायरेक्शन बँडचा सदस्य आणि गायक लियाम पेन हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडला त्यावेळचा असल्याचा खोटा दावा करत शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.